ठाकरे गटातील ५ जणांना अटक; अरविंद सावंत यांचं शिंदे गटाला आव्हान!
11-Sep-2022
Total Views | 217
54
मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या ठाकरे-शिंदे गटातील वादाचे रूपांतर अखेर मारामारीत झाल्याचे दादरमध्ये दिसून आले. गणपती विसर्जन मिरवणुकीवेळी, प्रभादेवीत आमदार सदा सरवणकर आणि शिवसैनिक भिडले. महेश सावंत यांच्यासह पाच शिवसैनिकांना अटक करून २५ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, रविवार ११ सप्टेंबर रोजी, अरविंद सावंत शिवसैनिकांना का अटक करण्यात आली, याचा जाब विचारण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यावेळी अरविंद सावंत आणि पोलिसांमध्येही किरकोळ वादावादी झाली. यावेळी त्यांनी पोलिसांशी चर्चा करुन प्रतिक्रिया देईन, असे सांगितले. यामध्ये सरवणकर यांनी गोळीबार केल्याचाही आरोप केला आहे. शिवाय, शिवसेना नेत्यांनी कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे. यावेळी त्यांनी, "मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे, त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे." असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीकास्त्र सोडलं आहे.