यंदाचे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे ‘अमृत महोत्सवी’ वर्ष आहे हे तर खरेच; परंतु त्याहीपुढे जाऊन या वर्षाचे आणि एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक, आध्यात्मिक अशा वैविध्यपूर्ण पातळ्यांवर काम करणार्या विवेकानंद केंद्राचे हे ‘सुवर्णमहोत्सवी’ वर्ष आहे. ते निमित्त साधून शिकागो येथील जागतिक सर्वधर्म परिषदेत झालेल्या स्वामी विवेकानंदांच्या गाजलेल्या भाषणाला आज, दि. 11 सप्टेंबर रोजी 129 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या विचारांवर टाकलेला हा प्रकाशझोत...
मी विवेकानंद म्हणतात, “आपण ज्या हिंदुस्थानात राहातो, त्या तुमच्या-माझ्या हिंदुस्थानातील हिंदू धर्मावर अनेक धर्मातील-जातीतील लोकांनी आक्रमणे केली खरी, तरीपण, हा धर्म केवळ टिकून आहे. एवढेच नव्हे, तर सर्व नद्यांचे पाणी ज्याप्रमाणे सागराला जाऊन मिळते, त्याचप्रमाणे सर्व धर्मांचे उगमस्थान वेगवेगळे असले तरी ते हिंदू धर्माला येऊन मिळाले आहेत. एवढेच नव्हे, तर हिंदू धर्माने सर्वांना सामावून घेतले आहे. यातूनच हिंदू धर्माची सहिष्णुता दिसून येते. परंतु, आजच्या काळात स्वतःच्या पंथाचा केवळ अभिमान बाळगून इतरांना तुच्छ लेखणे असो का, स्वत:चे मतच तेवढे खरे....!असे मानणे असो.
असल्या अनेक प्रकारांमुळे आपसांत होणारी भांडणे इतकी विकोपाला जात आहेत की त्यामुळे संस्कृतीचा र्हास होणे तर सोडाच, पण राष्ट्रा-राष्ट्रांमध्येदेखील भयंकर अस्वस्थता निर्माण झाली आहे. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे, माणसाची बनलेली कूपमंडुक वृत्ती! विहिरीत राहाणार्या बेडकाला ज्याप्रमाणे विहिरीपुरतेच जग सीमित वाटते, त्याचप्रमाणे प्रत्येक धर्मातील माणसाला ‘मी आणि माझा धर्मच तेवढा खरा..!’ असे वाटू लागले आहे, ही खूप खेदजनक गोष्ट आहे.
परंतु, येथे एक गोष्ट ध्यानात घेणे अत्यंत जरूरीची आहे की, गुरुत्वाकर्षण हे पूर्वीपासून होतेच, फक्त ते नियमांच्या भाषेत शब्दबद्ध केले गेले. तसेच दोन माणसे जरी दिसायला वेगळी असली तरी, त्यांच्या ठायी वास करणारा आत्मा हा एकच आहे...! त्याचप्रमाणे देवाला जरी तुम्ही ‘गॉड’, ‘अल्ला’, ‘फादर’ किंवा इतर काही म्हटले म्हणून त्याच्या ठिकाणचे देवत्व नष्ट होणार नाही की या जगात वसत असलेल्या दैवी शक्तिला धोका पोहोचणार नाही...!
प्रत्येक माणसाच्या ठायी वास करणारी प्रवृत्ती, त्याचे रंग-रुप, गुण-दोष हे भिन्न असले तरी त्यांच्याठायी वसणारा आत्मा एकच असतो, हे आपण पाहिले. या आत्म्याचे आणखी एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे की, तो फक्त माणसाच्या मृत्यूनंतर रंगभूमीवरच्या कलाकाराने ज्याप्रमाणे वस्त्र बदलून रंगभूमीवर प्रवेश करावा, त्याप्रमाणे तो एका देहातून दुसर्या देहात प्रविष्ट होतो अन् त्यालाच आपण नाव देतो, पुनर्जन्म....! त्यामुळे आत्मा अविनाशी आहे, हे चिरंतन सत्य आहे.
पण, मग प्रश्न असा उपस्थित होतो की, काम-क्रोध-लोभ-मद-मोह-मत्सर या षड्रिपुंनी युक्त अशा या ‘मी’ मध्येच हा आत्मा बद्ध कसा व का होऊन जातो? अन् ‘मी’, ‘माझे’ या शब्दांत अडकून जाताना ‘मी व माझा देव’ या शब्दांना जागाच न उरता ‘मी, माझे, मला’ एवढ्यापुरतेच त्याचे विश्व मर्यादित का व्हावे? परंतु, खरं सांगायचं तर आपण ज्या इंद्रियांच्या अधीन होऊन काम-क्रोधादी विकारांच्या विळख्यात बद्ध होतो, त्या इंद्रियांच्याही पलीकडे जाऊन या देहात चैतन्य जागृत ठेवणारी जी शक्ती आहे, त्या शक्तिला आपण शरण गेलो, तर आपल्या जन्माचे खर्या अर्थाने सार्थक झाले, असे म्हणता येईल आणि ‘मी, माझा धर्म, माझा पंथ तेवढेच खरे..!’ अशी कुपमंडूक वृत्ती न राहाता ‘ईशावास्यम् इदं सर्वम...!’ अशी वृत्ती मनात वास करू लागेल.
आपले वेद, उपनिषद, सातत्याने आपल्याला हाच संदेश देत आली आहेत. तेव्हा गरीब-श्रीमंत, उच्च-नीच, जात-धर्म यात कोणताही भेद न करता सर्वांठायी वसणारा आत्मा तर एक आहेच. परंतु, सर्व प्राणिमात्रांत वास करणारा ईश्वर ही सर्वत्र एकच आहे, याचे भान आपण सातत्याने आपल्या मनात जागते ठेवले, तर तुमच्या-माझ्या ठायी काम-क्रोधादी षड्रिपुंच्या माध्यमातून वास करणारा ‘मी’, ‘अहं’ गळून पडण्यास मदत होईल.
जितकी मते तितके मार्ग...! यानुसार कोणी मूर्तिपूजेला महत्त्व देईल, तर कोणी बाह्यपूजेला. परंतु, ईश्वरप्राप्ती हेच जर आपण आपले ध्येय मानले, त्या साध्याच्या दिशेने पाऊल टाकायला सुरुवात केली, तर विविधतेतून एकता या प्रकृतीच्या नियमानुसार, आपण ते साध्य निश्चित गाठू शकतो. मात्र, त्यासाठी वर वर्णन केल्याप्रमाणे सर्व आचरण करणे अत्यंत गरजेचे आहे.
त्यानुसार आचरण करू लागल्यावर ‘मी’ तर गळून पडेलच, परंतु आपल्या आचरणातून सहजतेने ‘विश्वबंधुत्वा’ची कल्पना साकारू लागेल, आचरणात येऊ लागेल. एवढेच काय पण, आपण आपल्या मनातला ‘विश्वबंधुत्व’ हा शब्द , त्याचा अर्थ, वगैरे सुद्ध गळून पडेल आणि,
हे विश्वचि माझे घर।
ऐसी मती जयाची स्थिर।
किंबहुना चराचर।
आपण जाहला॥
अशी अनुभूती आपणांस येऊ लागेल.
तेव्हा समस्त बंधुभगिनींनो, स्वामी विवेकानंदांच्या वेळचा काळ, त्यावेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात वरकरणी जरी महद्अंतर दिसत असले, तरीदेखील आजची सामाजिक परिस्थिती, समाजाची मानसिकता लक्षात घेता स्वामी विवेकानंदांच्या त्या वेळच्या भाषणावर आज पुनश्च एकदा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
त्यानिमित्ताने त्यांच्या भाषणाचा घेतलेला हा धावता आढावा...!
-प्रांजली कुलकर्णी