मुंबई : शिवसेना पक्ष हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे. त्यांनी हा पक्ष कसा बांधला? किती कष्ट करून पक्ष बांधला? हे सर्वांनाच माहित आहे. ज्यांनी ज्यांनी शिवसेना पक्ष सोडला आहे त्यांना बाळासाहेब ठाकरे यांची हाय लागली आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी केले आहे.
तसेच,"उद्धव ठाकरेंनी जेव्हा वर्षा हे शासकीय निवासस्थान सोडले त्यावेळी प्रत्येक महिलांच्या डोळ्यात अश्रू आले होते. हे अश्रू म्हणजे या चाळीस जणांना लागलेली हाय आहे. त्याचा न्याय होईलच," असे सुनील राऊतांनी म्हटले आहे. दरम्यान, देशातील सर्व कायदेतज्ञ म्हणतात एक तर शिंदे गट निलंबित होईल किंवा त्यांना दुसऱ्या एका पक्षात विलीन व्हावे लागले, असेही सुनील राऊतांनी स्पष्ट केले आहे.
त्याचप्रमाणे या सरकारचे सर्व निर्णय दिल्लीत होत असतात. आता बघूया दिल्लीतून काय निर्णय येतो. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असे म्हणत आहे. परंतु विस्तार झालेला नाही. हेच मी कधीपासून ऐकत असल्याचे म्हणत सुनील राऊतांनी शिंदे गटावर खोचक टीका केली आहे. तसेच ‘तारीख पे तारीख’ असेच सुरू आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यावर बोलू, असा टोलाही त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे.