अझरबैजानला भोवले पाकप्रेम, एससीओचे पूर्ण सदस्यत्व अद्याप नाहीच

    02-Sep-2025
Total Views |

azerbaijan
 
नवी दिल्ली : अझरबैजानने भारतावर शांघाय सहयोग संघटना (एससीओ) मध्ये त्याच्या पूर्ण सदस्यत्वाला अडथळा आणल्याचा आरोप केला आहे. अझरबैजानच्या माध्यमांनी भारतावर बहुपक्षीय कूटनीतीच्या तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत यामागे बदला घेण्याची भावना असल्याचा आरोप केला. या पार्श्वभूमीवर ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानला दिलेल्या अझरबैजानच्या पाठिंब्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव अधिक वाढल्याचे दिसून येत आहे.


या वादाची मुळे ‘ऑपरेशन सिंदूर’शी जोडली जात आहेत. भारताने पाकिस्तान व पाकिस्तान अधिकृत काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर लष्करी कारवाई केली असताना अझरबैजानने पाकिस्तानच्या बाजूने उघड समर्थन दर्शवले होते. नुकतेच चीनच्या तियानजिन शहरात अझरबैजानचे राष्ट्रपती इल्हाम अलीयेव यांनी पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भेट घेतली. या वेळी अलीयेव यांनी पाकिस्तानला ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताविरोधात ‘यश’ मिळाल्याबद्दल अभिनंदन केल्याचे समोर आले होते.


अलीयेव यांनी स्पष्टपणे म्हटले की, भारत कितीही आंतरराष्ट्रीय मंचांवर अझरबैजानचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न करेल, तरी बाकू पाकिस्तानसोबतचे ‘बंधुत्वाचे’ नाते अधिक बळकट करणार आहे. या भेटीत अलीयेव यांनी पाकिस्तान-अझरबैजानमधील राजकीय, सांस्कृतिक आणि धोरणात्मक संबंधांचे कौतुक केले. तसेच व्यापार व आर्थिक सहकार्य वाढवण्यावर भर देत यासाठी दोन्ही देशांच्या आंतर-सरकारी आयोगाच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.