भारत जागतिक सेमिकंडक्टर डिझाईनचा केंद्रबिंदू; पाचपैकी एक अभियंता भारतात
02-Sep-2025
Total Views |
नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी जगातील सुमारे 20 टक्के चिप डिझाईन अभियंते भारतात कार्यरत असून, भारत जागतिक सेमिकंडक्टर डिझाईन परिसंस्थेतील एक महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून उभा राहत असल्याचा निष्कर्ष बॅस्टियन रिसर्चच्या अहवालात काढण्यात आला आहे. या अहवालानुसार, क्वालकॉम, इंटेल, एनव्हीडिया, ब्रॉडकॉम आणि मीडियाटेकसारख्या आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपन्यांची मोठी संशोधन व डिझाईन केंद्रे बेंगळुरू, हैदराबाद आणि नोएडामध्ये कार्यरत आहेत. या मजबूत उपस्थितीमुळे भारत जगातील सेमिकंडक्टर डिझाईनच्या प्रमुख केंद्रांपैकी एक ठरला आहे.
अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की अमेरिकेतील अभियंते प्रामुख्याने चिपच्या उच्च-स्तरीय आराखड्यावर काम करतात. कोणत्या प्रकारची चिप विकसित करायची, तिचा वापर कोणत्या क्षेत्रात होणार, तिच्या वैशिष्ट्यांमध्ये काय असावे, तसेच उत्पादन धोरण काय असावे यासारखे प्रश्न ते ठरवतात. तर भारतातील अभियंते प्रत्यक्ष चिप तयार करण्याच्या प्रक्रियेत मोठा वाटा उचलतात. चिप्सची रचना प्रत्यक्ष लॉजिकमध्ये उतरवणे, त्यांची चाचणी करणे, वेग आणि वीज-कार्यक्षमता सुधारणा करणे, ड्रायव्हर्स आणि फर्मवेअर विकसित करणे तसेच डिझाईन ऑटोमेशन साधनांचे समर्थन करणे ही जबाबदारी भारतीय अभियंत्यांवर असते.
भारत सरकारने 2021 मध्ये सुमारे 76,000 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनांसह ‘सेमिकॉन इंडिया प्रोग्राम’ (इंडियन सेमिकंडक्टर मिशन 1.0) सुरू केला. अजूनही देशात मोठ्या प्रमाणावर सेमिकंडक्टर फॅब्रिकेशन युनिट्स स्थापन झालेली नसली, तरी या क्षेत्रात भारताच्या महत्त्वाकांक्षा आकार घेत आहेत. कुशल अभियंत्यांची फौज, मजबूत डिझाईन क्षमता आणि धोरणात्मक सरकारी प्रोत्साहन यांच्या आधारावर भारत जागतिक सेमिकंडक्टर साखळीत अधिक प्रभावी स्थान निर्माण करत आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.