ठाणे: कोरोनाचे सावट कायम असले तरी नियम शिथिल केल्याने दोन वर्षानंतर यंदा सर्वच उत्सव जल्लोषात साजरे होत आहेत. यावर्षी बुधवार, दि. ३१ ॲागस्ट रोजी श्री गणेश चतुर्थी असल्याने भाविकांचा उत्साह ओसंडुन वाहत आहे. श्री गणेश पूजनासाठी मध्यान्ह काळ महत्त्वाचा मानला जातो. यावर्षी बुधवार ३१ ॲागस्ट रोजी सकाळी ११-२५ पासून दुपारी १-५५ पर्यंत मध्यान्ह काळ आहे. जर यावेळेस गणेश पूजन करणे शक्य झाले नाही, तर संपूर्ण दिवसभर कधीही गणेश पूजन केले तरी चालेल. अशी माहिती पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.
ज्येष्ठा गौरी शनिवार ३ सप्टेंबर रोजी रात्री १०-५६ वाजेपर्यंत अनुराधा नक्षत्र असल्याने दिवसभर कधीही गौरी आणण्यास हरकत नाही. रविवार ४ सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी पूजन आहे. ज्येष्ठा गौरींचे विसर्जन चंद्र मूळ नक्षत्रात असल्याने सोमवार ५ सप्टेंबर रोजी रात्री ८-०५ पर्यंत करावे. शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. त्या दिवशी समुद्राच्या भरतीच्या वेळा सकाळी ११-१६ आणि रात्री ११-२७ अशा असून ओहोटीच्या वेळा पहाटे ४-३६ आणि सायं. ५-२२ अशा आहेत. असेही सोमण म्हणाले.
- पुढच्या वर्षी बाप्पा लवकर येणार नाहीत...
यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या ३१ तारीखला गणेश चतुर्थी आली आहे. तेव्हा, गणपती बाप्पा मोरया ... पुढच्या वर्षी लवकर या ! असा जयघोष निष्फळ ठरणार आहे. कारण पुढच्या वर्षी बाप्पाचे आगमन उशिराने होणार आहे. सन २०२३ मध्ये श्रावण अधिक (मास) महिना येणार असल्याने गणपती बाप्पाचे आगमन तब्बल १९ दिवस उशिरा म्हणजेच मंगळवार १९ सप्टेंबर २०२३ रोजी होणार असल्याचे दा. कृ. सोमण यांनी सांगितले.