ठाणे: पर्यावरणाभिमुख गणेशोत्सव साजरा व्हावा म्हणुन ठाणे महापालिकेन गणेश मूर्ती विसर्जनासाठी यंदाही ऑनलाईन टाईम स्लॉट बुकिंग योजनाही राबविण्यात येत आहे. या ऑनलाईन टाईम स्लॉट बुकिंगची कर्मचाऱ्यांकरिता कार्यशाळा आज महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे संपन्न झाली. यंदाही नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.
ठाणे महापालिकेने यावर्षीही ठाणेकरांसाठी विशेष पर्यावरणपुरक गणेश विसर्जन व्यवस्था उभारली असून यामध्ये १३ कृत्रिम तलाव, २० मुर्ती स्विकृती केंद्र व खाडी किनाऱ्यावरील ७ विसर्जन घाटांचा समावेश आहे. कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर गर्दीचे नियंत्रण करून नागरिकांना गणेश मूर्तीचे विसर्जन सुलभतेने करता यावे याकरिता ऑनलाईन स्लॉट बुकींग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व सार्वजनिक मंडळे व घरगुती गणेश मुर्तीच्या विसर्जनाकरिता नागरिकांना ठाणे महापालिकेच्या http://tmc.visarjansiots.com/ वर स्लॉट बुक करता येणार आहेत.
नागरिकांनी प्राथमिक माहिती व मुर्तीचा प्रकार याची माहिती सादर करून स्लॉट बुक करायचा असून बुकींग झाल्यावर त्यांना क्युआर कोडसह पावती उपलब्ध होईल. सदर पावतीची प्रिन्ट किंवा मोबाईलमधील डिजिटल प्रत विसर्जन स्थळावर सादर केल्यानंतर मुर्ती विसर्जन करता येईल.