मुंबई : आरे कारशेड प्रकरणातील आंदोलनात लहान मुलांचा वापर केल्यावरून आता आ आदित्य ठाकरेंवर कारवाई करण्याबाबतचे पत्र राष्ट्रीय बाल अधिकार सरंक्षण आयोगाने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिले आहे. ३ दिवसात एफआयआरसह अहवाल सादर केण्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कथित पर्यावरणवाद्यांचे सुरू असलेले हे आंदोलन आदित्य ठाकरेंच्या अंगलट येण्याचे चित्र आहे.
आदित्य ठाकरे यांनी रविवार १०जुलै रोजी आंदोलनात सहभाग घेतला होता. यावेळी आंदोलनात लहान मुलांचा वापर झाला असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्याची आयोगाने तातडीने दखल घेत घेतली आहे. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची सूचना राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाने दिली आहे. यासह ३ दिवसांत एफआयआरआरसह अहवाल देण्याचा राष्ट्रीय बाल आयोगाने मुंबई पोलिसांना आदेश दिले आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात रखडलेल्या मुंबईतील मेट्रोच्या कामाला गती मिळावी याकरिता फडणवीस शिंदे सरकारने सरकार स्थापनेच्या पहिल्याच दिवशी मेट्रो कारशेड आरे मध्येच होणार असल्याचे जाहीर केले. हा प्रकल्प रेंगाळल्यामुळे प्रकल्पाच्या किमतीत सुमारे १० हजार कोटींची वाढ झालीं आहे. शातच मागील सरकारने प्रस्तावित केलेल्या कंजूरमार्गची जागा ही कायदेशीर कचाट्यात अडकलेली आहे.
तसेच या जागेवर कारशेड नेल्यास १० हजार कोटींची आधीच पडलेला भार यातच कंजूरमार्ग येथे पुन्हा नव्याने ११ ते १५ हजार कोटींची अतिरिक्त वाढ प्रकल्पाच्या मूळ किमतीत होऊ शकते असाही अंदाज आहे. तसेच कंजूरमार्ग येथे कारशेड हलविल्यास आणखी ४ वर्षे मुंबईकरांना मेट्रो धावण्यासाठी वाटही पहावी लागेल.
मात्र आरेतील कारशेडच्या पुन्हा एकदा कथित पर्यावरणवाद्यांनी विरोध सुरू केला आहे. अशातच आरे बचाव चा नारा देत शिवसेनाही या आंदोलनात सहभागी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आ आदित्य ठाकरेंनी या आंदोलनस्थळी रविवारी भेट दिली होती. मात्र आता लहान मुलांना आंदोलनात सहभागी करून घेतल्याने आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर याबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
आरे आंदोलनात आदित्य ठाकरे यांनी लहान मुलांचा वापर करणे हे त्यांच्या असंवेदशीलता आणि वैफल्यग्रस्ततेचे निदर्शक आहे. शिल्लक सेनेकडे कार्यकर्ते उरले नाहीत बहुधा. आदित्य ठाकरे यांचा तीव्र निषेध.
- आ. अतुल भातखळकर, भाजप