
भोपाल: 'सामाजिक कार्यकर्त्या’ मेधा पाटकर यांच्या विरोधात आर्थिक फसवणुकी प्रकरणी मध्य प्रदेशात औपचारिक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेधा पाटकर आणि इतर अनेकांवर आदिवासी मुलांना शिक्षण देण्याच्या नावाखाली निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. या संदर्भात मेधा पाटकर आणि अन्य ११ जणांविरुद्ध मध्य प्रदेशातील बारवानी येथे एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
एफआयआरमध्ये तक्रारदार प्रीतम राज यांनी पाटकर यांच्यावर आदिवासी मुलांसाठी शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्याच्या बहाण्याने १३ कोटींहून अधिक रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप केला आहे. २००७ ते २०२२ दरम्यान आर्थिकरित्या दुर्बल आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी जमा झालेल्या सर्व देणग्यांचा हिशेब नसल्यामुळे पाटकर यांनी निधीचा गैरवापर केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
एफआयआरनुसार, मेधा पाटकर यांनी ‘नर्मदा नवनिर्माण अभियान’ फाऊंडेशनच्या माध्यमातून १३ कोटींहून अधिक रक्कम जमा केली. शिक्षणासाठी देणगी मागून सरकारविरोधी भावना भडकावल्याचा तिच्यावर आरोप आहे. मेधा पाटकर व्यतिरिक्त, एफआयआरमध्ये परवीन रोमू जहांगीर, विजया चौहान, कैलाश अवश्य, मोहन पाटीदार, आशिष मंडलोई, संजय जोशी आणि इतरांची नावे आरोपी म्हणून आहेत.
नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणाविरुद्धच्या ‘नर्मदा बचाव आंदोलना’साठी मेधा पाटकर प्रसिद्ध आहेत. या निषेधामुळे नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरण प्रकल्प वर्षानुवर्षे पुढे ढकलावा लागला होता. "नर्मदा बचाव आंदोलनादरम्यान" मनी लाँड्रिंगच्या संशयावरून, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या वर्षी दि. ५ एप्रिल रोजी कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला होता. ईडी व्यतिरिक्त, पाटकरच्या संदिग्ध व्यवहाराची चौकशी महसूल गुप्तचर विभाग आणि प्राप्तिकर विभागाकडूनही सुरू करण्यात आली आहे.