मुंबई : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावरील इगतपूरी ते आमणे या ७६ किलोमीटरचा चौथा टप्पा दि.५ जून रोजी वाहतुकीस खुला करण्यात आला. महाराष्ट्र समृध्दी महामार्गावर ६७०/६८० मध्ये भुयारी मार्ग पूलावर कॉक्रीट पृष्ठभागावर २५ मी.मी.जाडीचा डांबरी चर देण्यात आलेला आहे. दि. २४ जून रोजी मुसळधार पावसामुळे ७ ठिकाणी डांबरी पृष्ठभाग निघून खड्डे पडले होते. या खड्यांचे एकूण क्षेत्रफळ साधारण १ चौ.मी. होते. त्याचदिवशी तातडीने विशेष देखभाल पथकाद्वारे हे खड्डे भरण्यात येऊन या ठिकाणी असलेले डांबरी पृष्ठभाग पूर्ववत करण्यात आले आहे. सध्या या ठिकाणी समृध्दी महामार्गाची वाहतुक सुरळीत सुरू आहे. या भुयारी मार्ग पुलाची क्षती झालेली नाही. भुयारी मार्ग पुलाचे स्लॅब चे काँक्रीट व पूलाचे बांधकाम सुस्थितीत आहे, अशी माहिती महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.
एमएसआरडीसीने दिलेल्या माहितीनुसार, दि.५ जून रोजी वाहतुकीस सुरू झालेल्या इगतपूरी ते आमणे हा ७६ किमी या लांबीपेकी ५४.५० कि. मी. कॉक्रीट पृष्ठभागाची लांबी सुस्थितीत आहे. तसेच उर्वरित व्हायाडक्ट व पूलांवरील ११.५० कि.मी. डांबरी पृष्ठभागाची लांबी ही सुस्थितीत आहे. खड्डे पडलेला पृष्ठभाग फक्त १ चौ.मी. क्षेत्रफळाचा आहे. याचे प्रमाण ७६ कि. मी. लांबी मधील डांबरी पृष्ठभागापैकी अतिशय नगण्य आहे. समृध्दी महामार्गामध्ये काही तुरळक ठिकाणी उणिवा आढळल्यास व काही भाग खराब झाल्यास त्यांची दुरूस्ती करण्यासाठी दिवस रात्र विशेष दुरूस्ती पथकाची नेमणूक करण्यात आलेली आहे व या पथकाद्वारे दुरूस्ती तातडीने करण्यात येते. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग हा ७०१ किमीचा महामार्ग आय.आर.सी. मानकाप्रमाणे बांधणेत आलेला आहे व समृध्दी महमार्गाचा दोष दायित्व कालावधी ४ वर्ष असल्यामुळे या कालावधीत महामार्गाची देखभाल दुरूस्ती संबंधित कंत्राटदारामार्फत आवश्यकतेनुसार नियमित करण्यात येते.