मुंबई: गेल्या २४ तासात कुलाबा वेधशाळेेत २२७ मिमी आणि सांताक्रूझ वेधशाळेत १७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. असे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे. मुंबईसह उपनगरात तसेच ठाणे आणि नवी मुंबईमध्ये पुढील चार दिवस मध्यम ते मुसळधार पावसाच्या इशारा देण्यात आला आहे.
जुन महिन्यात दडी मारलेल्या पावसाने, जूनच्या शेवटीच जोरदार कमबॅक केला आहे. मुंबई व मुंबईच्या उपनगरात तसेच ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गुरवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या बहुतांश भागात पाणी साचले होते. दादर, माटुंगा, सायन येथील अनेक सखल भागात पाणी साचले होते. संध्याकाळी भरतीची वेळ असल्यामुळे हे पाणी साचल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकण किनारपट्टी भागात कमीदाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने दिला आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात मान्सून सक्रिय होईल, अशी शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकणसह मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने याविषयी मुंबई महानगरपालिकेला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या २४ तासात कुलाबा वेधशाळेेत २२७ मिमी आणि सांताक्रूझ वेधशाळेत १७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे