ठाणे : ‘दिव्याला अतिरिक्त पाणी मिळणार!’ अशा गमजा सत्ताधारी शिवसेनेमार्फत मारण्यास सुरुवात झाली असून, सोमवारीही दिव्यातील पाणीटंचाई सोडवण्यासाठी या भागाला मंगळवारपासून सहा ‘एमएलडी’ अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मात्र, ठाणे महापालिकेत एकहाती सत्ता असताना दिव्यात जलकुंभ उभारण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याचे कटू वास्तव समोर आले आहे.
दिवा भागातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन येथे दहा ‘एमएलडी’ पाणी वाढवून मिळावे, अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. त्यानुसार साडेतीन ‘एमएलडी’ पाणी उपलब्ध झाले असले तरी दिव्यातील वाढत्या लोकसंख्येला हा पाणीपुरवठा अपुरा ठरत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहेत. शहरी भागांमध्ये राहून दिव्यातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिकांकडून सातत्याने पुरेसे पाणी उपलब्ध करण्याची मागणी केली होती. परंतु, ‘एमआयडीसी’कडून पाणीपुरवठा होत नसल्याने नगरविकास विभागाकडून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सोमवारी विशेष बैठकीचे आयोजन केले होते. आता निवडणूक जवळ आल्याने बैठकांचा रतीब सुरू झाला असला तरी मागील दहा वर्षे दिव्यातील जनता पाण्यासाठी वणवण भटकत असून आठ जलकुंभांपैकी केवळ दोनच जलकुंभ उभारता येणार आहेत.
दिव्यातील जलवितरणाच्या दृष्टीने जलवाहिन्यांच्या नूतनीकरणाची कामे सुरू करण्यात आली असली तरी या भागात आठ जलकुंभ मंजूर करण्यात आले आहे. परंतु, हे जलकुंभ बांधण्यासाठी महापालिकेकडे जागा उपलब्ध नसल्यामुळे या भागातील जलकुंभांचे काम रखडले आहे. त्यावर या भागातील महसूल विभागाकडे उपलब्ध असलेल्या जागा महापालिकेस जलकुंभ उभारणीसाठी देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानुसार दोन ठिकाणच्या जागा देण्यावर जिल्हाधिकार्यांकडून सहमती दर्शवण्यात आली असून यासंदर्भातील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
आज संयुक्त पाहणी करणार
कल्याण-डोंबिवलीसह २७ गावांचा पाणीप्रश्न सोडविण्याबाबत सोमवारच्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली. त्यानुसार या भागातील पाणीप्रश्न समजून घेण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अधिकारी, ‘एमआयडीसी’चे अधिकारी, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांनी मंगळवारी संयुक्त पाहणी करून अतिरिक्त पाणीपुरवठ्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देशनगरविकासमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.