मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडिया च्या माध्यमातून मनसैनिकांना आवाहन केले आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया होणार होती, पण डॉक्टरांना कोरोना संसर्गाचे लक्षण आढळल्याने शस्त्रक्रिया पुढे ढकलली आहे. यावर राज ठाकरे म्हणतात की, "१४ तारखेला माझा वाढदिवस आहे. माझ्या वाढदिवसाला आपण सर्व भेटून मला शुभेच्छा देता. मात्र, यावेळेस मला भेटायला कोणीही येऊ नये. मी कोणालाही भेटणार नाही. आपण जिथे कुठे असाल तिथेच सुरक्षित राहा."
राज ठाकरेंचे ऑडिओ पोस्टमधून आवाहन :
"माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो, पुण्याला जी सभा झाली त्या सभेत मी सर्वांना सांगितले की, माझी एक शस्त्रक्रिया करायची आहे. त्यासाठी मी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झालो. सर्व टेस्ट झाल्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितले, 'कोविडचा डेड सेल आहे'. हे काय असते मला माहीत नाही. माझी शस्त्रक्रिया रद्द झाली आहे. कोविद लक्षणांमुळे मला १०-१५ दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे. येत्या १४ जूनला माझा वाढदिवस आहे. आपण सर्व मला भेटून शुभेच्छा देता. पण यावेळी तसे करता येणार नाही. या भेटीतून काही संसर्ग झाल्यास पुन्हा शस्त्रक्रिया पुढे ढकलली जाईल. त्यामुळे आता मला कोणताच धोका पत्करायचा नाही. त्यामुळे मी १४ तारखेला कोणालाच भेटणार नाही. तुम्हीही माझ्या घरी येऊ नये. आपण जिथे आहात तिथेच राहा. माझी जेव्हा शस्त्रक्रिया पूर्ण होईल तेव्हा मी स्वत:हून सर्वांना भेटेन."