तिरुवन्नामलाई: धर्मांतर न केल्याने तामिळनाडूच्या तिरुवन्नामलाईतील मारुथुवमपडी गावात रोमन कॅथलिक चर्चने गावकर्यांचा जाण्या-येण्याचा रस्ताच बंद केल्याचा संतापजनक प्रकार उजेडात आला आहे. याबाबत गावकर्यांनी जिल्हाधिकार्यांकडे चर्चविरोधात कारवाईची मागणी केली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, चर्चने गावकर्यांना ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करायला सांगितले होते. पण गावकर्यांनी त्याला नकार दिला. त्यामुळे चर्चने गावकर्यांना त्रास देण्यासाठी रस्ता बंद करण्याचा उद्योग केला, असा आरोप गावकर्यांनी केला आहे. सोबतच धर्मांतराला नकार देणार्यांच्या मुला-मुलींना शालेय शिक्षण द्यायलाही चर्चने नकार दिला. या गावात तीन हजारांपेक्षा अधिक हिंदू राहतात, या सर्वांनीच चर्चची धर्मांतराची मागणी धुडकावली. त्यानंतर चर्चने हिंदू ज्या रस्त्याने जातात, त्या रस्त्यावरच भिंत बांधली.
चर्चच्या या उद्योगानंतर गावकर्यांनी तिरुवन्नामलाईच्या जिल्हाधिकार्यांना एक पत्र लिहून कॅथलिक चर्चद्वारे संचालित शाळेचे प्रशासकीय अधिकारी फादर येसुपदम यांच्यावर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी बळजबरी केल्याचा आरोप लावला आहे. सोबतच ख्रिश्चन पाद्रीने सार्वजनिक रस्ता बंद करण्यासाठी चर्चच्या चारी बाजूंनी भिंत उभी केल्याचा आरोपही गावकर्यांनी केला आहे. चर्चच्या शाळेत हिंदू आणि ख्रिश्चन विद्यार्थ्यांना वेगवेगळी वागणूक दिली जात असल्याचाही आरोप आहे.
दरम्यान, आम्ही गेल्या १०० वर्षांपासून इथल्या रस्त्याचा वापर करत आहोत. पण चर्चने रस्ता बंद केल्यापासून आपल्याला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी अधिकच्या अंतरावरुन जावे लागते, असे गावकर्यांचे म्हणणे आहे. कोरोनामुळे दोन वर्षे शाळा बंद होती. त्यानंतर शाळा उघडली, तर आम्हाला आनंद झाला. पण नंतर चर्चच्या शाळेतल्या अधिकार्यांनी आम्हाला धर्मांतराचे आवाहन केले, अशी गावकर्यांची तक्रार आहे.
तसेच संपूर्ण शुल्क भरूनही हिंदू विद्यार्थ्यांना कोणतीही सवलत देण्यात येत नाही. उलट परीक्षा सुरू झाल्यानंतर हिंदू विद्यार्थ्यांना शाळेत यायला अडवले जाते. आता तर चर्चच्या शाळेत फक्त ख्रिश्चन विद्यार्थ्यांनाच आत जाण्याची परवानगी आहे, असे गावकर्यांचे आरोप आहेत. दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना चर्चच्या पाद्रीने वादग्रस्त जमिनीवर चर्चची मालकी असल्याचे व त्यावर आपल्याला भिंत उभारण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे.