मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय संजय कदम यांनी सोमवारी (दि. ३० मे) ईडी कार्यालयात हजेरी लावली. अनिल परब यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईनंतर शुक्रवार, दि. २७ मे रोजी संजय कदम यांच्याही मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. त्यावेळी कागदपत्रांसह चौकशीला हजर राहण्याचे समन्स ईडीने कदम यांना बजावले होते. या पार्श्वभूमीवर कदम हे ईडी कार्यालयात पोहोचल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार? असा प्रश्न सध्या उद्भवतो आहे.
ईडीकडून साई रिसॉर्टची कागदपत्र ताब्यात
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर काही दिवसांपूर्वी ईडीने कारवाई करत काही कागदपत्रे ताब्यात घेतली होती. मुंबईसह पुणे आणि मुरुड येथेही ईडीने धाडी टाकल्या होत्या. यानंतर पुन्हा एकदा शुक्रवारी ईडीचे पथक दापोलीत दुसऱ्यांदा पोहोचले आहे. यावेळी ईडीने मुरुड ग्रामपंचायतीकडून साई रिसॉर्टची कागदपत्र ताब्यात घेण्यात आली. साई रिसॉर्टशी आपला कोणताही सबंध नसल्याचे अनिल परब यांचे म्हणणे आहे. तर हे रिसॉर्ट अनिल परब यांचेच असून ते अनधिकृत असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून देण्यात आली. त्यामुळे या घोटाळ्याच्या सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी सोमय्यांकडून करण्यात आली आहे.