मुंबईतील ‘बाकचोच तुतारी’ची मंगोलियात वारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-May-2022   
Total Views |
cs

 
 
मुंबई(उमंग काळे): मुंबईच्या मानखुर्द सॉल्टपॅन्स येथे रिंग केलेला बाकचोच तूतरी पक्षी (कर्ल्यू सँडपायपर) मध्य मंगोलियातील उगी तलावात आढळून आला आहे. या पक्ष्याला जानेवारी २०२२च्या सुरुवातीला मानखुर्द सॉल्टपॅन्स येथे बीएनएचएसकडून रिंग लावण्यात आली होती. 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने (बीएनएचएस) रिंग केलेल्या कर्ल्यू सँडपायपर पक्ष्याने या प्रवासादरम्यान तब्बल ४.५ हजार किमीचे अंतर कापल्याची माहिती समोर आली आहे.
 
 
पक्षी स्थलांतराच्या एकूण आठ आकाशमार्गांपैकी 'सेंट्रल एशियन फ्लायवे' या आकाशमार्गामध्ये भारताचा समावेश होतो. या आकाशमार्गावरून उत्तर आशियातील बहुतांश पक्षी हिवाळ्यात भारतात स्थलांतर करतात आणि परत सुद्धा याच मार्गाने जातात. 'बीएनएचएस'कडून या स्थलांतराचा शास्त्रीय अभ्यास गेल्या सहा ते सात दशकांपासून सुरू आहे. हा अभ्यास वेगवेगळ्या पद्धतीद्वारे केला जातो. 'रिंग' आणि 'कलर फ्लॅग' ही त्यामधील सर्वसामान्यपणे वापरली जाणारी पद्धत आहे. ही पद्धत जगभर वापरली जाते. यामध्ये पक्ष्याच्या पायाला सांकेतिक क्रमांक असलेली ‘रिंग’ आणि विशिष्ट रंगाचा ‘फ्लॅग’ लावण्यात येतो. या 'फ्लॅग'चा रंग हा प्रत्येक देशानुसार वेगवेगळा असतो आणि आंतरराष्ट्रीय करारानुसार संशोधकांना रंगाचा हा नियम पाळूनच पक्ष्यांच्या पायात 'फ्लॅग' लावावा लागतो. आतापर्यंत 'बीएनएचएस'च्या टीमने गेल्या तीन वर्षांमध्ये १० हजाराहून अधिक पक्ष्यांना 'रिंग' केले आहे.
 
 
सध्या पावसाळ्याच्या तोंडावर भारतात स्थलांतरित झालेले पक्षी पुन्हा आपल्या मायदेशी परतत आहेत. यामाध्यमातून पक्षी स्थलांतरासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. कर्ल्यू सँडपायपर पक्ष्याच्या स्थलांतराबाबत अशीच एक नोंद समोर आली आहे. 'बीएनएचएस'ने मुंबईतील मानखुर्द सॉल्टपॅन्सच्या पाणथळीवर जानेवारी २०२२मध्ये कर्ल्यू सँडपायपर पक्ष्याच्या पायात रिंग लावली होती. मध्य मंगोलियातील डोंगराळ प्रदेश आणि गवताळ प्रदेशांमधील उगी हे गोड्या पाण्याचे सुंदर तलाव आहे. याठिकाणी पक्षी निरीक्षणासाठी गेलेल्या पक्षीनिरीक्षकांना जानेवारी २०२२ रोजी रिंग केलेला कर्ल्यू सँडपायपर पक्षी दिसला. त्यांनी यासंदर्भातील माहिती 'बीएनएचएस'ला कळवली. त्यानंतर 'बीएनएचएस'ने यासंदर्भातील माहिती टि्वट करुन दिली. ‘कर्ल्यू सँडपायपर’ पक्ष्याच्या स्थलांतराविषयी झालेली ही नोंद महत्त्वाची असून त्याने या प्रवासात ४,१०० किमी अंतर (सरळ रेषेत) कापल्याची शक्यता आहे.

 
 
‘कर्ल्यू सँडपायपर’विषयी
‘कर्ल्यू सँडपायपर’ची चोच लांब आहे. तिचे टोक वक्राकार आहे आणि रंग काळा आहे. तसेच या पक्ष्याचे पायदेखील काळे आहेत. त्यांच्या गैर-प्रजनन काळात त्यांचा पिसारा वर राखाडी-तपकिरी असतो, खालचे पंख पांढरे असतात. तसेच उडताना पांढर्‍या पंखांची पट्टी दिसते. कर्ल्यू सँडपायपर हे तलाव, दलदल, चिखल आणि किनारी ओलसर जमिनीच्या सभोवतालच्या उथळ पाण्यात हे अन्न शोधतात. आणि खुल्या दलदलीत, चिखलात आणि खारट जमिनीवर वीण करतात
@@AUTHORINFO_V1@@