म्हाडा मुंबई मंडळातर्फे १४९अनिवासी गाळे ई-लिलाव नोंदणी व अर्ज प्रक्रियेला १२ ऑगस्टपासून प्रारंभ २९ ऑगस्ट रोजी एकत्रित निकाल

Total Views |

मुंबई : मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा विभागीय घटक) मुंबईमधील विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या परिसरातील अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी आयोजित ई-लिलावाकरिता ऑनलाईन नोंदणी व अर्ज प्रक्रियेला दि. १२ ऑगस्ट, २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपासून प्रारंभ होणार आहे, अशी माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली.

या लिलावात मुंबईतील मुलुंड गव्हाणपाडा येथे ०६ अनिवासी गाळे, कुर्ला- स्वदेशी मिल येथे ०५, तुंगा पवई येथे ०२, कोपरी पवई येथे २३, चारकोप येथे २३, जुने मागाठाणे बोरीवली पूर्व येथे ०६, महावीर नगर कांदिवली पश्चिम येथे ०६ अनिवासी गाळे, प्रतीक्षा नगर सायन येथे ०९, अँटॉप हिल वडाळा येथे ०३, मालवणी मालाड येथे ४६ अनिवासी गाळे, बिंबिसार नगर गोरेगाव पूर्व येथे १७ अनिवासी गाळे व शास्त्री नगर-गोरेगाव, सिद्धार्थ नगर, मजासवाडी जोगेश्वरी पूर्व येथे प्रत्येकी ०१ अनिवासी गाळा विक्रीसाठी उपलब्ध आहे.

दि. २८ ऑगस्ट, २०२५ सकाळी ११ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत संगणकीय प्रणालीमध्ये पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी ऑनलाइन बोली स्वरूपातील ई-लिलाव www.eauction.mhada.gov.in या संकेतस्थळावर होणार आहे. दि.२९ ऑगस्ट,२०२५ रोजी सकाळी ११ वाजता https://eauction.mhada.gov.in व https://mhada.gov.in या दोन्ही संकेतस्थळांवर ई-लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

मुंबई मंडळातील अनिवासी गाळ्यांच्या ई-लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी https://eauction.mhada.gov.in संकेतस्थळावर नोंदणी करणे, ऑनलाईन अर्ज करणे, कागदपत्रे अपलोड करणे, अनामत रक्कम ऑनलाईन भरणे यासाठी दि. १२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेपासून ते दि. २५ ऑगस्ट रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.ई लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जदाराचे वय ई लिलावासाठी अर्ज करतेवेळी १८ वर्षापेक्षा जास्त असावे, अर्जदाराने महाराष्ट्र राज्यातील सन २०१८ नंतर काढलेले अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असून ऑफसेट किंमतीनुसार विहित अनामत रक्कम भरणे गरजेचे आहे.

या लिलावाबाबत विस्तृत पात्रता निकष, प्रत्येक गाळ्याचे विवरण, सामाजिक आरक्षण व अर्ज करण्याची कार्यपद्धती, सविस्तर अटी व शर्ती, ऑनलाईन अर्ज सूचना,माहितीपुस्तिका याबाबतची माहिती https://eauction.mhada.gov.in व https://mhada.gov.in या संकेतस्थळावरील Lottery>Eauction>eauction या पोर्टलवर उपलब्ध आहे. अर्जदाराने संकेतस्थळावरील व माहिती पुस्तिकेतील सविस्तर सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज सादर करावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.