भगवान गोपालकृष्णांच्या जीवनघटनांद्वारे भगवान वेदव्यास राजयोग्यांचा प्रशस्त मार्ग प्रत्येक आवश्यक अशा कर्मानुसार सांगत आहेत. कृष्णाचा जन्म मध्यरात्रीच का होतो? सर्व जग ज्यावेळेस निद्रेत असते, त्यावेळेस योगी जागृत असतो. गीता सांगते, ‘या निशा सर्व भूतानां तस्यां जागर्ति संयमी।’ अशा मध्यरात्रीच्या शांत वेळी योगी आपले चित्त एकाग्र करून विश्वशक्तीचे स्वत:मध्ये कर्षण करीत असतो. ‘कर्षति इति कृष्णः’ योग्याच्या या महान कर्षण अवस्थेलाच वेदव्यास ‘कृष्ण’ म्हणतात. ही कृष्ण अवस्था योग्यांच्या चित्तात मध्यरात्री जन्मास येते, म्हणून कृष्णाचा जन्म मध्यरात्री दाखविला आहे.
यमुना म्हणजे ‘सुषुम्ना नाडी’ होय. ही सुषुम्ना म्हणजे यमुना पार केल्याशिवाय त्या कृष्णावस्थेला मथुरानिवासी नंदाच्या घरी जाता यायचे नाही. सुषुम्ना पार केल्यावर योग्याला जो एक अवर्णनीय दिव्य स्वात्मानंद प्राप्त होतो, त्यालाच वेदव्यास ‘कृष्णपिता नंद’ असे म्हणतात. नंद, वसुदेव, कृष्ण हे सारे गवळी मानले गेले आहेत. गवळी ‘गौ’ म्हणजे गाईच्या स्तनातील अमृतमय दुग्ध कर्षण करणारे असतात. ‘गौ’चा अर्थ इंद्रिये असा सुद्धा होतो. आपल्या इंद्रियांचे योग्य पालन करून (गोपाळ) त्यांचे अनुभवस्तनातून दिव्य अमृतरस काढणारा प्रत्येक योगी ‘ग्वाला’ म्हणजे गवळी नाही का? मग गोपाळकृष्णांची जात कोणती? गवळी की परमयोगी? जीवनाचे योगमार्गाद्वारे मंथन केल्याशिवाय योग्याचे जीवनाला स्थान नसते. असे ते मंथनयुक्त स्थान म्हणजे नंदाची मथुरा नगरी होय. आता यमुना का खवळली होती? वारा, पाऊस, धुंद का होता? हा सुषुम्ना पार करणार्या योग्याचा अनुभव असतो. सुषुम्ना पार करताना विश्वशक्ती भयंकर विरोध करीत असतात. तसल्या दिव्य वैश्विक शक्तीचा विरोध म्हणजे यमुनारूप सुषुम्ना पार करताना आलेला दिव्य वारा, पाऊस होत.
आता कृष्ण व त्याचे सात भावंडांना कंस मामा का मारतो? संस्कृतात ‘कसं’ म्हणजे कापणे असा शब्द आहे. ‘स’वरील अनुस्वार ‘क’ वर आणून वेद व्यासांनी ‘कंस’ शब्द तयार केला आहे. असेच शब्द इतर आहेत. जसे ‘हिंसा’ शब्दापासून ‘सिंह’, तर ‘रवी’पासून ‘वीर’ शब्द तयार झाला आहे. तद्वत ‘कसं’शब्दापासून ‘कंस’ शब्द तयार केला आहे. ‘कंस’पासूनच कसाई शब्द तयार झाला आहे. कसाई शरीराला कापतो. तद्वत साधकाच्या चित्तात ज्या उत्तम वृत्ती उत्पन्न होतात, त्यांनाच साधकातील स्वत:च्या इतर वृत्ती विरोध करीत असतात, कापत असतात. असल्या वृत्ती साधकाच्या चित्तातीलच असल्यामुळे कंसाला त्याचा सख्खा मामा दाखविला आहे. प्रत्येक साधकाच्या अंत:करणात असा कंस दडून देववृत्तींना मारण्याचा प्रयत्न करीत असतो. असल्या वाईट वृत्ती जरी मामासारख्या आपल्याच वाटल्या, तरी ज्याला भगवान श्रीकृष्ण व्हायचे आहे, अशा साधक श्रेष्ठाला, असल्या नीच वृत्तीचा नायनाट करावाच लागतो. साधकाच्या हृदय सिंहासनावर विराजमान झालेल्या कंस मामाला खाली खेचून कृष्ण साधकाला त्याचा वध करावाच लागतो.
कृष्णाचे कथित जीवन योगमार्गातील क्रमवार उपासना होत. योगसाधना कशा कराव्यात, याचा साद्यंत इतिहास होय. यम म्हणजे नियंत्रण. कोणत्याही साधकाला उच्चपद प्राप्त करण्याकरिता स्वत:च्या जीवनावर योग्य नियंत्रण करावे लागते. असा हा कृष्णाचा प्रथम सहोदर यम होय. दुसरे अपत्य ‘नियम’ होय. नियम म्हणजे उत्तम संस्कारांचे ग्रहण करणे होय. नंतरचे अपत्य आसन होय. आसनामुळे योग्याचे शरीराला प्राकृतिक अवस्था प्राप्त होऊन शरीर निरोगी राहते आणि त्यामुळे मनसुद्धा निरोगी बनते. आसनानंतरच खरा योगमार्ग सुरू होतो. समाधी लागल्याशिवाय साधक योगी बनूच शकत नाही. वासुदेव देवकीचे आठवे अपत्य योगेश्वर गोपाळकृष्ण होय. आसनानंतरचे महत्त्वाचे अपत्य म्हणजे प्राणायाम होय. यम नियमाने मन, देहाला योग्य वळण लावून आसनाद्वारे शरीर व मन निरोगी केल्यानंतरच साधक प्राणायाम साधू शकतो.
प्राणावर नियंत्रण ठेवून प्राणशक्ती वाढविणे म्हणजे प्राणायाम करणे होय. योग्य गुरूंच्या सान्निध्याविना ‘कुंभक’ प्राणायाम करू नये. ‘पूरक’, ‘कुंभक’ यांचे प्रमाण सुरुवातीला ‘१:४:२’ असे असावे. नंतर अभ्यासाने ते प्रमाण ‘१:८:२’, ‘१:१२:२’, ‘१:१६:२’, ‘१:२०:२’, ‘१:२४:२’ असे क्रमागत हळूहळू वाढवावे. शेवटी १:३६:२ प्रमाण झाल्यावर प्राणायाम पूर्ण झाला, असे समजावे. प्राणायामानंतरचे अपत्य म्हणजे ‘प्रत्याहार’ होय. ‘प्रतिआहार’ म्हणजे ‘प्रत्याहार’ होय. विश्वातील अनेक दिव्य शक्तींपैकी आपल्या धारणेस आवश्यक अशा शक्तींचा आहार करणे म्हणजे ‘प्रत्याहार’ होय. आपण जे अन्न खातो, त्यापैकी आवश्यक असेच अन्न जठर पचविते व अनावश्यक अन्न विष्ठारूपाने बाहेर पडते. तद्वत् विश्वातील अनेक शक्तिप्रवाहांचे आहे. उपकारक अवस्था वा शक्तीची धारणा करून अनावश्यक अवस्था वा शक्तींना बाहेर टाकणे म्हणजे ‘प्रत्याहार’ होय. प्रत्याहारानंतर ध्यान येते. शरीरातील सर्व चैतन्य एकाग्र एकविषयक करणे म्हणजे ध्यान होय. ध्यानानंतर धारणाशक्ती येते. हीच कृष्णाची बहीण व वसुदेव देवकीची सातवी अपत्य कन्यका होय. हिचा वध झाल्यावरच पुढील कृष्णरूप समाधी अवस्था जन्माला येते.
अशी ही गोपालकृष्णाची अष्टपरंपरा आहे. विनायक आठ आहेत. वसुही आठच आहेत आणि कृष्णही आठवाच आहे. आठांचा हा दिव्य आठ आपल्याला समजल्याशिवाय कृष्णाचे खरे स्वरूप, त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लक्षात येणार नाही. जोपर्यंत साधक स्वत: अष्टांग योगमार्गाने वर जात जात खालील अवस्था नष्ट करीत कृष्ण बनत नाही, ध्यान-धारणा करीत नाही, तोपर्यंत कृष्णजन्माचा अर्थ समजणार नाही. कृष्णाचे संपूर्ण जीवन म्हणजे योगमार्गाने साधना करू गेल्यास कोणत्या क्रमाने साधकाला काय काय साधना व यम-नियम पाळायचे, याचे व्यासकृत वर्णन आहे, हे बर्याच उच्च योगसाधकांच्या सुद्धा लक्षात येत नाही. कृष्णजन्मकथा म्हणजे योगसाधना करण्याकरिता साधकाने कोणत्या मार्गाचे अनुसरण करावे, याचे मार्गदर्शन आहे. या महान वैदिक परंपरेत नेटाने प्रयत्न केल्यास प्रत्येक जण नराचा नारायण होऊ शकतो. (क्रमशः)
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)