पुणे : पुण्यातील पुण्येश्वर मंदिर की छोटा शेख दर्गा हा वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुण्यातील पुण्येश्वर आणि नारायणेश्वर या दोन मंदिरांच्या जागी छोटा शेख आणि बडा शेख हे दोन दर्गे उभारण्यात आले आहेत असा दावा करून हिंदू संघटना या विषयावरून आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. या दोन्ही दर्ग्यांचे ज्ञानवापी ढाच्यासारखे सर्वेक्षण करण्यात यावे अशी मागणी हिंदु संघटनांकडून केली जात आहे. या वादात मनसे नेते अजय शिंदे आणि ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे हे दोन नेते आक्रमक झाले आहेत.
ज्ञानवापी ढाच्यासारखीच याही दर्ग्यांवर गणपती,कमान, कलश यांसारखी हिंदू प्रतीके आजही दिसतात असा दावा करण्यात आला आहे. ही प्रतीके याजागी आधी हिंदू देवालय असल्याचा पुरावा आहेत असे सांगितले जात आहे. या दोन्ही दर्ग्याचे सर्वेक्षण झाले तर इथेही या आधी काय होते हे सगळ्यांसमोर येईल या हेतूने ही सर्वेक्षणाची मागणी केली जात आहे. पुण्यातील शनिवार वाड्याजवळ आणि लाल महालाच्या मागे असलेल्या कुंभार वेशीजवळ ही मंदिरे आहेत.