राळेगणसिद्धी : ‘लोकायुक्त कायदा’ तयार करण्याचे लेखी आश्वासन देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. मात्र, अडीच वर्षे उलटूनही त्यावर काहीच होत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर बोलायलासुद्धा तयार नाहीत. नेमके या कायद्याबद्दल काय झाले, हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात मोठे जनआंदोलन करण्याची गरज आहे,” असे म्हणत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे.
राज्यातील ३५ जिल्ह्यांत आणि २५० पेक्षा अधिक तालुक्यात भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाची समिती ‘लोकायुक्त कायदा’ करा, अन्यथा सत्तेतून पायउतार व्हा तयार झाली असल्याची माहिती अण्णांनी दिली.
सोबतच फडणवीस सरकारच्या काळात कायदा तयार करण्याचे आश्वासन आम्हाला दिले गेले होते. त्यानंतर सरकार गेले. नंतर आलेल्या ठाकरे सरकारनेदेखील आम्हाला लेखी आश्वासन दिले. दरम्यान, सात बैठका सरकार प्रतिनिधींसोबत झाल्याही, पण पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असे अण्णा हजारेंनी म्हटले आहे. तसेच ‘एकतर कायदा करा अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा,’ असा इशारा अण्णांनी सरकारला दिला आहे.