ठाणे : जगविख्यात भारतीय चित्रकार राजा रविवर्मा यांच्या १७४ व्या जन्मदिनाच्या निमित्ताने ‘राजा रविवर्मा चित्र-विश्व’ या विशेष प्रदर्शनाचे आयोजन ठाण्यातील प्राच्यविद्या अभ्यास संस्थेच्या दालनात करण्यात आले आहे. २९ एप्रिल ते ७ मे असे नऊ दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात राजा रविवर्मा यांची १५० दुर्मिळ चित्रे, व्याख्याने, चित्रकला कार्यशाळा, माहितीपट इत्यादी कलाकृतींना 'याची देही याची डोळा' रसिकाना अनुभवता येणार आहे.
ठाण्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात प्राच्यविद्या अभ्यास संस्था मोलाची भूमिका बजावत आहे. ४० वर्षांपासून हिंदुस्थानी कला, संस्कृती आणि संस्कृत भाषेचे संशोधन, प्रचार आणि प्रसाराचे काम करणारी ही ठाण्यातील अतिशय महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेमार्फत प्राच्यविद्येसंबंधी विविध चर्चासत्रे, परिषदा, अभ्यासदौरे, ग्रंथप्रदर्शने आणि व्याख्यानाचे नियमितपणे आयोजन केले जाते. या उपक्रमाचा भाग म्हणून जगविख्यात भारतीय चित्रकार राजा रविवर्मा यांच्या १७४ व्या जन्मदिनाच्या निमित्ताने 'राजा रविवर्मा चित्र - विश्व' या विशेष प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
नऊ दिवस चालणाऱ्या या चित्रप्रदर्शनादरम्यान होणाऱ्या विविध कार्यक्रमांत प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत, विजयराज बोधनकर, नीलिमा काढे, श्रीपाद भालेराव, विलास बळेल, श्रीराम खाडिलकर आणि रविप्रकाश कुलकर्णी आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.या कार्यक्रमाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक २९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता प्राच्यविद्या अभ्यास संस्था, ठाणे महापालिका उर्दू शाळेजवळ,हाजुरी दर्गा रोड, ठाणे (प.) येथे होणार आहे. अशी माहिती प्राच्यविद्या अभ्यास संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी दिली.