
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांना कोरेगाव भीमा प्रकरणात साक्ष देण्यासाठी चौकशी आयोगाने साक्ष बजावली आहे. ५ आणि ६ मे रोजी पवारांना साक्ष देण्यासाठी हजर रहावे लागणार आहे. १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास करण्यासाठी न्यायालयीन चौकशी आयोग स्थापन करण्यात आला होता.
"कोरेगाव भीमा दंगल व एल्गार परिषद खटल्या संदर्भात पवार साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन अर्धवट आणि दिशाभूल करणारे मुद्दे मांडले होते. त्यांनी न्यायालयीन चौकशी आयोगासमोर शपथेवर व पुराव्यासह बोलावे म्हणून आयोगाला आम्ही अर्ज केला होता. त्यानुसार आयोगाने पवारांना समन्स बजावले होते.", अशी माहिती 'विवेक विचार मंच'चे राज्य समन्वयक सागर शिंदे यांनी दिली.
"यापूर्वीही दि. २३ व २४ फेब्रुवारीला पवारांची साक्ष व उलट तपासणी सुरू होणार होती. परंतू पवार साहेबांनी दि. २१ रोजी चौकशी आयोगाच्या कार्यलयात जाऊन आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेतली व आणखी वेळ मागून घेतला, तसेच अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करणार असल्याचे कळाले. खरं तर पवारांनी आयोगाला सामोरे जायला हवे होते, कोरेगाव भीमा हिंसाचार घटनेला चार वर्षे झालीत आता पवार साहेबांना आणखी कशाला वेळ हवा आहे? प्रतिबंधित माओवादी संघटनेच्या धोरणानुसार एल्गार परिषद व त्यानंतर कोरेगाव भीमा हिंसाचार झालेला आहे. त्या खटल्यात १५ आरोपी अटकेत आहेत. तरी पवार साहेब आता आणखी काय भूमिका घेतात याकडे आमचे लक्ष आहे.", असेही शिंदे म्हणाले.