पालिकेचे रस्ते कामांसाठी बंद, चिंता कशाला?

गुगल मॅप वाटाड्या आहे ना...

    23-Apr-2022
Total Views | 59
 G 3
 
 
 
मुंबई : यापुढे मुंबई महापालिकेचे जे रस्ते कामांसाठी बंद होतील त्यांची माहिती 'गुगल'ला अधिकृतपणे कळविली जाणार आहे. त्यानंतर २४ तासात संबंधित माहिती 'गुगल' नकाशांवर अद्ययावत होणार असल्यामुळे हा ‘वाटाड्या’ मुंबईकरांची मदत करणार आहे. पालिकेच्या तंत्रज्ञान खात्याच्या पुढाकाराने यासंबंधीची प्रायोगिक चाचणी यशस्वी झाली.
 
 
 
दक्षिण मुंबईतील गणपतराव कदम मार्ग येथे सुरू असलेल्या कामांची माहिती 'गुगल'ला कळवली होती. आता त्या ठिकाणी लाल रंगातील ठळक ठिपक्यांची रेषा दिसत होती. या रेषेवर 'क्लिक' केल्यानंतर हा रस्ता बंद असल्याचा कालावधी देखील दिसला. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता याच धर्तीवर भविष्यात जे रस्ते बंद असतील, त्यांची माहिती 'गुगल'ला कळविण्यात येणार आहे.
 
 
 
भविष्यात पालिकेच्या अखत्यारितील रस्त्यांच्या कामांव्यतिरिक्त एम एम आर डी ए , वाहतूक पोलीस यंत्रणा यांच्या सहकार्याने पालिका क्षेत्रातील इतर रस्त्यांची माहिती गुगल मॅपवर उपलब्ध करून देण्याचे पालिकेचे नियोजन आहे. पालिका क्षेत्रात भ्रमंती करताना आजकाल अगणित व्यक्ती 'गुगल'मॅप’चा हमखास वापर करतात. विविध दुरुस्ती कामांसाठी रस्ते बंद असल्यास त्याची माहिती शेकडो चालकांना कळवण्याची तसदी महापालिकेने आत्तापर्यंत घेतलेली नाही, काही ठिकाणी फलक लावले असले तरी ते दर्शनी भागात नसल्यामुळे चालक गोंधळात पडतात आणि रस्ता सापडत नसल्याने त्यांचा त्रागा होतो, वेळ जातो. शिवाय या कामांची माहिती 'गुगल' मॅपवर अद्ययावत नसते. त्यामुळे नागरिकांना प्रत्यक्ष त्या रस्त्याजवळ गेल्यानंतरच रस्ता बंद असल्याचे कळते.
 
 
 
ही बाब लक्षात घेऊन नागरिकांची अशी गैरसोय न होण्यासाठी तंत्रज्ञान खात्याने आता अभिनव उपक्रम हाती घेतला. आयुक्त / प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल यांचे मार्गदर्शनात आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी हा उपक्रम राबवला आहे. जे रस्ते दुरुस्तीकामांसाठी बंद ठेवण्यात येतील, त्यांची आगाऊ माहिती 'गुगल'ला अधिकृतपणे कळविण्यात येईल. रस्ता शोधताना रस्ता बंद असल्याचे नागरिकांना सहजपणे कळेल आणि बंद असलेल्या रस्त्याला पर्यायी मार्गदेखील 'गुगल मॅप' द्वारे दर्शविला जाणार आहे, असे तंत्रज्ञान विभागाचे संचालक तथा सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी सांगितले.
 
 
 
पालिकेच्या अखत्यारीतील जे रस्ते विविध दुरुस्ती कामांसाठी किंवा स्थापत्य कामांसाठी पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार बंद असतील त्यांची माहिती पालिकेद्वारे अधिकृतपणे 'गुगल' ला लेप्टन या संस्थेच्या सहकार्याने कळविण्यात येईल. माहिती कळविल्यानंतर पुढील २४ तासांमध्ये ही माहिती 'गुगल मॅप' वर अद्ययावत होईल . यापूर्वी 'कोविड -१९' या साथरोगाच्या काळात बृहन्मुंबई पालिका क्षेत्रातील 'कंटेनमेंट झोन'ची (विलगीकरण क्षेत्र) माहिती पालिकेच्या पुढाकाराने व 'गुगल'च्या सहकार्याने नागरिकांना 'गुगल मॅप' वर उपलब्ध होती.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121