स्तुती करावी त्या राघवाची...

    24-Mar-2022
Total Views | 188

ramdas swami  
 
 
रामाच्या अंगी असलेले गुण सर्वश्रेष्ठ असल्याने त्याची कीर्ती वर्णन करुन लोकांना राघवाचा पंथ दाखवावा. स्तुती करायची, तर राघवाची करावी, त्याच्या गुणांची करावी. इतर मानवी व्यक्तींची स्तुती करणे, त्यांची कीर्ती वर्णन करणे, हे योग्य होणार नाही, असे स्पष्ट उद्गार स्वामींनी काढले आहेत. भगवंताला विसरून मानवाची स्तुती करणे, योग्य होणार नाही, हा विचार समर्थांनी दासबोधातही स्पष्टपणे मांडला आहे.
 
 
या पूर्वीच्या काही श्लोकांतून समर्थांनी मृत्यूची अपरिहार्यता सांगितली आहे. तसेच पूर्वकर्मानुसार जे संचित जीव बरोबर घेऊन आलेला असतो, त्या संचिताचे चांगले वा वाईट परिणाम या जन्मात टाकता येत नाहीत, हेही स्पष्ट केले. त्यामुळे प्रत्येक जीव हा मृत्यू आणि पूर्वसंचित यांच्या अधिपत्याखाली वावरत असतो. हे जरी खरे असले, तरी जीवाला सद्प्रवृत्त आणि चारित्र्यसंपन्न वागण्याचे स्वातंत्र्य असते. अशा वागण्याने जीवाला आपलेसे करुन घेता येते, असे सांगण्याचा समर्थांचा रोख आहे. तेव्हा मृत्यू व नियती यांच्याकडे कसे पाहायचे व त्यांचा आत्मोद्धारासाठी कसा सकारात्मक उपयोग करुन घ्यायचा, ही समर्थांची मनाच्या श्लोकांतून दिलेली शिकवण आहे. समर्थ पुढे सांगतात की, जे टिकणारे नाही, त्याची आशा-इच्छा-आकांक्षा धरून काय उपयोग? जर आशा-इच्छा-आकांक्षा धरायचीच, तर ती रामाची, भगवंताची असू द्या. त्याने तुम्हाला खर्‍या आयुष्याची जाणीव होऊन तुमचा इहलोकीचा व परलोकीचा मार्ग सुलभ होईल. समर्थ सांगतात,
 
मना राघवेवीण आशा नको रें।
मना मानवाची नको कीर्ति तूं रे।
जया वर्णिती वेद शास्त्रें पुराणें।
तया वर्णितां सर्वही श्लाघ्यवाणें॥१८॥
 
 
व्यवहारात सर्वसाधारणपणे माणसाला आशा ही कार्यप्रवृत्त करते. आशेवर माणूस जगत असतो. असे आहे तर मग अशाश्वताची आशा धरुन ते मिळविण्यासाठी व नंतरच्या दुःखाची अनुभूती घेण्यापेक्षा रामाची, भगवंताची म्हणजे शाश्वताची आशा धरणे केव्हाही श्रेयस्करच. अशी आशा बाळगल्याने भगवंताचे सद्प्रवृत्त गुण काही अंशाने का होईना, तुमच्यात संक्रमित होतील आणि त्या गुणांच्या आधारावर तुम्हाला समाधानाने आत्मोद्धाराचा मार्ग संचिताच्या प्रभावाची काळजी करणार नाही. राघवाचा हा भक्तिपंथ आचरत असताना राम सर्वस्व आहे, असा निश्चय करुन भगवंताशिवाय इतर अशाश्वताची आशा-आकांक्षा सोडून द्यावी लागते. रामाच्या अंगी असलेले गुण सर्वश्रेष्ठ असल्याने त्याची कीर्ती वर्णन करुन लोकांना राघवाचा पंथ दाखवावा. स्तुती करायची, तर राघवाची करावी, त्याच्या गुणांची करावी. इतर मानवी व्यक्तींची स्तुती करणे, त्यांची कीर्ती वर्णन करणे, हे योग्य होणार नाही, असे स्पष्ट उद्गार स्वामींनी वरील श्लोकात काढले आहेत. भगवंताला विसरून मानवाची स्तुती करणे, योग्य होणार नाही, हा विचार समर्थांनी दासबोधातही स्पष्टपणे मांडला आहे. एवढेच नव्हे, तर अशा रीतीने वाटेल त्या नराची स्तुती करणार्‍याला स्वामींनी मूर्खांच्या गटात टाकले आहे-
 
सांडूनिया श्रीपती। जो करी नरस्तुती।
कां दृष्टी पडिल्यांची कीर्ती।
वर्णी तो येक पढतमूर्ख॥(दा.२.१०.१८)
 
 
स्वामी म्हणतात, भगवंताकडे पाठ फिरवून एखाद्या नराची उगीचच स्तुती करणे किंवा दिसेल त्याची वाहवा करणे, हे मूर्खपणाचे लक्षण आहे. नीट विचार केला, तर एखाद्या माणसाची उगीचच स्तुती करणे, चारचौघांत त्याची कीर्ती वर्णन करणे, असे आढळून आले, तर त्यामागे काहीतरी स्वार्थी हेतू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. समर्थांचा हा गुणविशेष आहे की, प्रचितीशिवाय कधीही ते एखादे विधान करीत नाहीत. समर्थांच्या काळी आणि आजही काही कीर्तनकार अथवा हरिदास कीर्तन करायला जेथे जातील तेथील श्रीमंत व्यक्तींची आणि आयोजकांची ते कीर्तनातून स्तुती करीत असतात. अशा हरिदासी बुवांबद्दल स्वामींनी नाराजी व्यक्त केली आहे. कारण, हे हरिदास हरीचे दास न राहता, माणसांभोवती फिरत राहून त्यांची स्तुती करीत फिरत आहेत. ते हरिदास नसून आता कलावंत झाले आहेत. देवाला सोडून देऊन ते स्वार्थासाठी माणसाला प्रदक्षिणा घालू लागले आहेत. समर्थ म्हणतात-
 
हरिदासे साहित्य वाढविलें।
हरिदास्य सांडोनि कलावंत जालें।
देव सांडोनि फिरो लागले।
मनुष्यांभोवतें॥
 
 
स्वामींनी वरील श्लोक १८ मध्ये, ‘मना मानवाची नको कीर्ती तूं रे।’ हे केलेले विधान विचारपूर्वक केले आहे. स्वामी असे का सांगत आहेत, याचा नीट विचार केल्यावर ते आजच्या काळातही योग्य आहे, असेच म्हणावे लागते. राघवाचा पंथ समजून सांगताना स्वामींनी ‘मानवाची कीर्ती नको’ असे विधान केले आहे. ते आध्यात्मिकदृष्ट्या आणि भक्तिमार्गात किती योग्य आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. परमेश्वराला विसरून आपण जर एखाद्या भोंदूबाबाची, बापूची, बुवाची उगीचच स्तुती करू लागलो, तर त्यात आपली फसगत होण्याची शक्यता अधिक असते. आजही सभोवार पाहिले, तर अनेक भोंदूबाबांची, बुवांची प्रकरणे बाहेर आलेली आहेत, येत आहेत. या जगात कोणी सभ्यतेचा, अध्यात्मसिद्धींचा मुखवटा घातला, तर सर्वसामान्य माणसाला ते समजत नाही. त्या भोंदूंच्या सांगण्यावर विश्वास ठेवून सामान्य माणसे भारावून जातात. त्या बाबाला ते परमेश्वराचा कलियुगातील अवतार समजू लागतात व तसा प्रचार करू लागतात. त्यामुळे अनेक भोळे भाविक फसतात व तेही त्या बाबाला भजू लागतात. अशा बाबांच्या, बुवांच्या वरवरच्या गोड बोलण्यावर, त्याच्या वक्तृत्वावर, पोशाखावर बाह्यांगावर फसतात. परंतु, पुढे नंतर या भोंदूबुवांचे खरे स्वरुप व प्रताप उजेडात आल्यावर त्याच्या भक्तांच्या श्रद्धेला, मनाला तडा जातो. त्याचा घाव वर्मी लागून त्यापासून सावरण्यास बराच काळ लागतो. आज अनेक भोंदूबाबा, बापू त्यांचे हीन चरित्र उघड झाल्यामुळे गजाआड शिक्षा भोगत आहेत. समर्थकाळीही अशा भोंदूगुरुंची उदाहरणे समर्थांना ज्ञात असावीत. समर्थांनी ती प्रकरणे त्यांच्या तीर्थाटनाच्या काळात लिहिलेली असावीत. म्हणून समर्थ सांगतात की, ‘हे मना, राघवाला सोडून तू मानवाची कीर्ती वर्णू नको.’ भक्तिमार्गात मानवांची कीर्ती गाण्यापेक्षा निष्कलंक अशा परमेश्वराची स्तुती करणे केव्हाही श्रेयस्कर असते. वेद, शास्त्रे, पुराणे पाहिली, तर असे दिसून येते की, पुरातन काळाच्या राजेरजवाड्यांचे त्यांच्या वैभवाचे वर्णन त्यात आढळत नाही. त्यांची स्तुती कुठेही केलेली वेदांमध्ये दिसत नाही. तथापि त्यात भगवंताची स्तुती केलेली आढळते आणि हेच श्लाघ्यवाणे म्हणजे योग्य आहे, असे समर्थांचे मत आहे. यावरुन स्वामींच्या मनात सत्य आणि मिथ्या काय आहे, यासंबंधी विचार आला असावा. तोच स्वामींनी पुढच्या श्लोकात सांगितला आहे-
 
मना सर्वथा सत्य सांडूं नको रे।
मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे।
मना सत्य ते सत्य वाचें वदावें।
मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें ॥१९॥
 
 
समर्थांनी स्पष्ट उपदेश केला आहे की, सत्य कधी सोडू नका आणि जे खोटे आहे ते सोडून द्या. असत्याची मांडणी करीत बसू नका. आपल्या नेहमीच्या बोलण्यातही सत्याचाच पाठपुरावा करावा. कसल्याही मोहाला बळी पडून खोट्याला आपल्या मनात थारा देऊ नका. खोटे, असत्य, असेल ते सोडून द्या. त्यावर विचार करीत बसू नका. असत्य मनातून काढून टाका. म्हणजे असत्य तुमच्या भाषेत येणार नाही.
- सुरेश जाखडी

svjakhadi@gmail.com
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121