मुंबई:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम यंदा मुंबई ऐवजी पुण्यात आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेकांवर टीका करताना नक्कल केली. यात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह इतरांचाही समावेश आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आमचं राजकारण नकलांवर चालत नाही असं म्हटलं आहे. आता यावरून पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे. राऊतांच्या प्रतिक्रियेनंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या टीकेवर उत्तर देताना ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, डुप्लिकेट, नकली काही नाही असं म्हटलं होतं. त्यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करताना म्हटलं की, बेअक्कल लोकांचीच नक्कल केली जाते आणि हो स्वर्गीय बाळासाहेब सुद्धा बेअक्कल लोकांचीच नक्कल करायचे. बाळासाहेबांची जे शिकवणच विसरले आहेत त्यांना अक्कल कुठून असणार?? असा सवालही केला.