वैदिक परंपरा आणि साधना : भाग-२५

    24-Feb-2022
Total Views | 140

vaidic
 
 
ध्यान
 
ध्यानाचा अभ्यास दृढ आणि दीर्घकाळ करण्याच्या अवस्थेला ‘धारणा’ म्हणतात. १५ मिनिटे ध्यान कायम ठेवल्यास एक मिनिट अवस्थेची प्राप्त होऊ शकते. धारणेमध्ये ध्येयविषय सोडून अन्य विषयाचे अस्तित्व उरत नाही. सखोल ध्यान म्हणजे धारणा. धारणा ही समाधीची पहिली पायरी आहे. साधकाचा पिंडधर्म जागृत होतो. पिंडधर्म जागृत झाल्यावर साधक आपल्या पिंडधर्मानुसार समाधीअवस्था आणि ज्ञान प्राप्त करेल. या परिपक्व धारणा अवस्थेमध्ये काही साधक स्वप्नात किंवा ध्यानामध्ये कुत्र्याचा दर्शन-साक्षात्कार अनुभवतात. सगुणोपासनेमध्ये प्रथम कुत्र्याचे दर्शन आवश्यक आहे. श्वानदर्शन म्हणजे स्वत:च्या धर्माचा उदय आहे, म्हणून योगेश्वर भगवान दत्तात्रेयांच्या मागेपुढे कुत्री दाखविलेली आहेत. हे साधनानुभवाचे रहस्य आहे. हा केवळ कल्पनाविलास किंवा ग्रंथपांडित्य नाही. ‘धारणा’ शब्द तीन किंवा धातू मिळून बनतो, ‘धृ’ म्हणजे पकडून ठेवणे, ‘अर’ म्हणजे गतिमानता आणि ‘अन’ म्हणजे स्पंदन करणे. म्हणून ‘धारणा’चा अर्थ आहे, या अखंड गतिमान जगाच्या स्पंदनातून आपल्या धर्माला योग्य असे जीवन स्पंदन पकडून आपला साधनामार्ग क्रमण करणे. धर्म म्हणजे हिंदू, ख्रिश्चन किंवा मुसलमान धर्म नसून ज्या धारणेतून आपली पिंडरचना झाली आणि ज्या पिंडरचनेनुसार आपली प्रगती साधावयाची आहे, तो साधना मार्ग होय.
गीतेमध्ये भगवान अर्जुनाला उपदेश करतात, “हे अर्जुना, तू मोहामुळे शस्त्रसंन्यास करुन स्वस्थ बसला आहेस आणि शांततेच्या गोष्टी करतो. परंतु, तुझा धर्म म्हणजेच पिंडरचना किंवा प्रकृती क्षत्रिय धर्माची म्हणजे युद्धाची असल्यामुळे तू थोड्या वेळाने पुन्हा उभा राहशील म्हणून हे तू न विसरता युद्धाला सिद्ध हो आणि माझ्याद्वारे अगोदरच मारल्या गेलेल्या कौरवांचा नाश कर.” विभिन्न धारणेच्या म्हणजे धर्माच्या साधकांना एकाच धारणेने म्हणजे पूजाप्रकाराने बांधण्याने प्रगती होणार नाही. परंतु, अधिकांश कथित धर्म पूजेच्या एकतेवर (Regimentation) भर देऊन आपल्या अनुयायांचा खरा धर्म दडपून टाकून त्यांचे आध्यात्मिक अस्तित्व नष्ट करतात. आज धर्माच्या नावावर धर्मांतर, जुलूम, जबरदस्ती, बलात्कार आणि प्रलोभन चालू आहे. हा धर्म नसून मानवाला पशू बनविणारा अधर्म आहे. धर्म त्यालाच म्हणावे की, ज्यामुळे मानवाचा देव बनतो, दानव होत नाही. संख्यावृद्धी म्हणजे धर्मप्रचार नाही. जो आत्मज्ञान मिळवून देईल तोच धर्म.
 
समाधी
 
‘सम+आधी’ म्हणजे ‘समाधी.’ म्हणजे ज्याची आधिव्याधी सम झालेली आहे, असा स्थितप्रज्ञ साधक समाधी अवस्था प्राप्त करतो. ही अवस्था आपोआप स्वभावत:च येते. समाधीचे मुख्य दोन प्रकार आहेत, एक सबीज म्हणजे सगुण आणि दुसरा निर्बीज किंवा निर्गुण. लक्षावधी साधकांतून एखाद्यालाच सगुण किंवा सबीज समाधी लागेल, तर कोट्यवधींमधून एखाद्यालाच निर्बीज किंवा निर्गुण समाधीची अवस्थारहित अवस्था लाभेल. सबीज समाधीचे चार प्रकार आहेत. सबीज, सगुण, सविचार आणि सवितर्क. यांचा छेद केल्यास सबीज समाधी आठ प्रकारची होते जिचे अष्टविधा प्रकृतीशी साधर्म्य आहे. याकरिता भगवान श्रीकृष्णाला आठ पत्नी होत्या, असे मानलेले आहे. ते स्वतःसुद्धा आठवा अवतार होते व त्यांचा जन्म अष्टमीचाच आहे. या कथेत योगरहस्य आहे. प्रयत्न केल्यास प्रत्येक साधक कठोर आणि अविरत साधनेद्वारे स्वत: भगवान श्रीकृष्ण बनू शकतो. ‘नर करनी करे तो नर का नारायण होत.’ अनेक जन्मांच्या सततच्या अभ्यासानंतर समाधी प्राप्त होते. शुद्ध प्रकृतीस्थ शरीर आणि मनाची अत्यंत शुद्ध आणि स्थिर अवस्था म्हणजे समाधी. सतत अभ्यास आणि वैराग्य याद्वारे ही अंतिम अवस्था प्राप्त होते. भगवान म्हणतात, ‘अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते॥६.३५॥’
 
ज्ञान आणि देवता दर्शन
 
सबीज समाधीमध्ये मनाचा व्यवहार अतिशय सूक्ष्म आणि सजीव असतो. म्हणून अशा प्रकारच्या सबीज समाधीमुळे साधकाच्या मनाचे सूक्ष्म संस्कार सजीव होऊन त्याला इष्टदेवेचे दर्शन घडवितात. वस्तुजातीच्या चरमावस्थेचे ज्ञान याच समाधीमध्ये होते. निर्गुण निराकार अवस्था हे चरम सत्य आहे. म्हणून या चरम अवस्थेच्या तुलनेने ज्ञानावस्थासुद्धा खालच्या स्तराची आहे. सामान्य लोक दर्शन साक्षात्कार आणि ज्ञानप्राप्तीतच धन्यता मानतात. दर्शन आणि ज्ञान या काही कमी श्रेणीच्या अवस्था नाहीत. यांची प्राप्ती होणारे साधकसुद्धा धन्य आहेत व दुर्मीळ आहेत.
  
ऋतंभरा प्रज्ञा
 
सबीज सविकल्प समाधीनंतर ऋतंभरा प्रज्ञा नावाची एक अत्युच्च अवस्था आहे. साधकाच्या चित्तात ज्या कल्पनेचे ज्ञानबीज असेल, त्यानुसार ज्ञान किंवा दर्शन सबीज समाधीमध्ये होते. परंतु, चित्त निर्बीज होऊन विश्वव्यापी बनते. त्यावेळी साधकाला एका अत्युच्च प्रज्ञेची प्राप्ती होते की, ज्यामुळे त्याला वस्तुमात्राच्या धर्म आणि उत्पत्तीच्या कारणांमुळे ज्ञान प्राप्त होते. या अवस्थेमध्ये साधकाला विश्वाचे निर्माण ज्या कारणांमुळे आणि जेथून होते, त्या अंतिम अवस्थेचे ज्ञान प्राप्त करुन देणारी प्रज्ञा म्हणजे बुद्धी प्राप्त होते म्हणून तिला भगवान पतंजली ‘ऋतंभरा तस्य प्रज्ञा’ म्हणतात. ज्ञान आणि अस्तित्व यांची अंतिम अवस्था म्हणजे ‘ऋतंभरा प्रज्ञा’ होय. निर्विकल्प समाधी जिच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संकल्प, विकल्प, ज्ञान, विज्ञान किंवा अज्ञानही राहत नाही, अशी ही एक सर्वोच्च अवस्थारहित अवस्था आहे. या अवस्थेत काहीच राहत नाही.
मनाची अवस्था पूर्णपणे नष्ट झाल्यावरच ही अवस्थारहित अवस्था साधकाला प्राप्त होते. परमयोगी जेव्हा या श्रेष्ठ अवस्थारहित अवस्थेतून खाली सविकल्प समाधीमध्ये येतो, तेव्हा त्याला समजते की, तो पूर्वी अशा निर्विकल्प अवस्थारहित अवस्थेप्रत पोहोचला होता. या निर्विकल्पाबद्दल एवढेच सांगणे शक्य आहे. कारण, तेथे कशाचेच अस्तित्व नाही, जे शब्दापलीकडे आहे अशा शून्यावस्थेचे वर्णन कसे करता येईल? याच शून्यावस्थेमधून सकल विश्वाची उत्पत्ती होते व प्रतिक्षणी ते शून्यावस्थेत जाते, कोट्यवधीमधून एखादाच श्रेष्ठ योगी या शून्यावस्थेची अनुभूती घेऊ शकेल. कारण, अनुभूती घेण्याकरिता तेथे कोणीच नसते. तेथे काय दिसते? तर काहीच नाही. कोणता अनुभव येतो तर काहीच नाही आणि अनुभूती कोण घेतो, तर कोणीच नाही, असे परमयोगी शरीराने जीवंत असले तरी मुक्तच असतात. त्यांचे स्वत:चे असे काहीच नाही. ते विश्व बनून विश्वाच्या पलीकडे राहतात. ते आहेतही आणि नाहीतही. गीतेत या परम अवस्थेचे वर्णन केलेले आहे. ‘यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम्।’
(क्रमशः)
 
- योगिराज हरकरे 
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे -९७०२९३७३५७/ ९५९४७३७३५७))
 
अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121