अहिल्यानगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी कार्याचे स्मरण म्हणून अहिल्यानगर शहरात त्यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या ऐतिहासिक क्षणाला मोठ्या संख्येने नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम जय भीमच्या घोषात परिसर दुमदुमून गेला.
या पुतळ्याच्या अनावरणासोबतच शहरात प्रस्तावित असलेल्या संविधान भवनासाठी एकूण १५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये जिल्हा नियोजन समितीकडून ५ कोटी तर राज्य शासनाकडून १० कोटींचा निधी समाविष्ट आहे. या संकल्पनेचा पाठपुरावा आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून करण्यात आला असून, "बाबासाहेबांचे विचार आणि संविधान पुढच्या पिढीला समजले पाहिजे", ही भावना यामागे असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, प्रा. जोगेंद्र कवाडे, लहू कानडे, भन्ते राहुल बोधी, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, सीईओ आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, आयुक्त यशवंत डांगे, डॉ. पंकज जावळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
गायक आनंद शिंदे यांच्या भीमगीतांनी वातावरण भारावले. बाबासाहेबांचा पुतळा केवळ स्मारक नसून सामाजिक न्याय, समता व बंधुभावाचे प्रतीक आहे, असे मत उपस्थितांनी व आयोजकांनी व्यक्त केले.