मुंबई : शनिवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडीचा सर्वात मोठा घोटाळा येत्या आठवड्यात जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. मात्र आता त्यांनाच घरचा आहेर मिळाल्याचे उघड झाले आहे. "साहेबांना (बाळासाहेब ठाकरेंना) संरक्षण देताना राणेंनी जीवाची पर्वा केली नव्हती.", असे म्हणत शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी माने यांनी राऊतांना टोला लगावला आहे.
शिवाजी माने यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की,
"तुम्ही ईडीचा जरूर बाहेर काढा परंतु राज्यसभेत व लोकसभेत जनतेचे प्रश्नही मांडा. ईडीचं काय वाकडं होणार आहे हे आम्हाला माहीत आहे. आज पर्यंत अधिकार्यांचं जे झालं तेच आत्ता होणार आहे. आणि हे सर्वांनाच ठाऊक आहे. सध्या जी समाजकारणाची नवी पध्दती पहावयास मिळत आहे, ज्याला आपण सुडाचे राजकारण म्हणु शकतो. आम्ही कुणाशी भांडत आहोत; आपल्याशीच नं. काँग्रेस व राष्ट्रवादीं रिंगणाच्या बाहेरून मजा पाहत आहे. अजितदादा पवार वगळता या विषयावर कुणी भाष्य केलंय हे ऐकण्यात किंवा वाचण्यातही आलेलं नाही. गोरगरीबांना घरे देण्याचं सोडून आम्ही आमचीच पाडापाडी करत आहोतं. अश्याने साध्य काय होणार?"
"संजय राऊत कोण होते त्यांचा पगार किती होता; नारायण राणेंचे व्यवसाय कोणते? कुणी किती कष्टाने कमाई केली हे संपुर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. साहेबांना संरक्षण देण्यासाठी त्यांनीच त्याच्या जिवाचीं पर्वा केली नव्हतीं हे तुम्ही विसरलात का? मुबंईत जी शिवसेना वाढली ज्यात मोजून काही मंडळी होती; त्यांत राणेही होतेच नं.? ऊगाच शिळ्या कढीला ऊत का आणत आहात? दत्ता सामंतापासूनच्या हत्येचा शोध घेत बसा. कोण कोण गुन्हेगार आहेत व कोणी गुन्हा करण्यास मदत केली, ते सर्व बाहेर येईलं. शेवटी तुम्ही आम्ही सर्वचं जण फाटक्या शिवसैनिकांच्या जीवावर मोठे झालो आहोत. हे विसरून चाललोत हे मात्र नक्की. फाटक्यांचे राज्य कधी येणार? त्यांचं स्वप्न कधी पुर्ण होणार? एक गोष्ट विसरू नका; मुबंईला वाचविणारी मंडळीच आपआपसात भिडते आहे व ती कशी संपेल याचीचं वाट आता काँग्रेस पहात आहे.