भक्तिसंप्रदाय उद्धारक श्रीमत्मध्वाचार्य

    10-Feb-2022
Total Views |

bhakti sampraday
 
 
आज भक्तिसंप्रदाय उद्धारक वीर वैष्णव तसेच वायुदेवाचे तिसरे अवतार मध्वाचार्य यांचा बद्रीगमन दिन आहे, अर्थातच मध्वनवमी. संपूर्ण कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात मध्वनवमी मोठ्या भक्तिभावाने साजरी करतात. मध्वनवमीच्या औचित्याने मध्वाचार्य यांच्या जीवनाचा व तत्त्वज्ञानाचा थोडासा परामर्श घेण्याचा या शब्दवाहीच्या माध्यमातून हा अल्पसा प्रयत्न.
भारतीय (मुख्यतः हिंदू धर्म) तत्त्वज्ञानाचा मुख्य गाभा वेदांत आहे, असे समजले जाते. त्यात पूर्व व उत्तर मीमांसा, सांख्य, न्याय, वैशेषिक, योग, उपनिषदे, श्रीमद्भगवद्गीतेचा समावेश होतो. यात मुख्यतः प्रस्थानत्रयींवर भाष्य लिहिणार्‍यांस ‘आचार्य’ वा ‘भाष्यकार’ म्हणून संबोधले जाते. तसेच प्रस्थानत्रयी म्हणजे ‘ब्रह्मसूत्र’, उपनिषदे व श्रीमद्भगवद्गीता यांना संबोधले जाते. यावर विविध आचार्यांनी आपली भाष्ये लिहिली आहेत. त्यात जगद्गुरू श्री आद्य शंकराचार्य, श्री रामानुजाचार्य श्री मध्वाचार्य, श्री निंबार्काचार्य, श्री वल्लभाचार्य या वंदनीय प्रातःस्मरणीय आचार्यांनी श्रुती, स्मृती, पुराणे यांच्या आधारे श्रुतिसंमत भाष्ये लिहिली. आद्य श्री शंकराचार्य यांनी ज्ञानपर, तसेच जीव-ब्रह्म ऐक्य प्रतिपादित केवलाद्वैताची मांडणी केली. बाकी आचार्यांनी द्वैतपर मांडणी केली आहे. हिंदू धर्म १६ खांबांवर उभा आहे. ते कोणते? चार साधना मार्ग, चार आश्रम, चार पुरुषार्थ व चार वर्ण अशा भक्कम खांबांवर उभा आहे. तसेच भारतीय आध्यात्मिक तत्त्वज्ञान हे मुख्यतः तीन उज्ज्वल परंपरांवर उभे आहे. त्या तीन परंपरा ऋषी, आचार्य व संत परंपरा! कशा? ऋषी विचार, आचार्य आचार, हे संतांनी सामान्य भाविकांपर्यंत नेले व रुजवले. महाराष्ट्रात श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री तुकोबाराय व श्री रामदास स्वामी आदी संतपरंपरेने, तर कर्नाटकात हरिदास परंपरेने, उत्तरेत श्री तुलसीदास, श्री कबीर, मीराबाई,सुरदास, दक्षिणेत तिरुवल्लुर व अल्लवार संतांनी भाविकांच्या मनोवृत्तीनुसार व प्रकृतिभेदानुसार ऋषी व आचार्य परंपरा मुरवली आहे. ही वस्तुस्थिती इतकी खरी आहे की, कोणीही विवेकी व सश्रद्ध भाविक या मताशी सहमत होईलच. भक्ती ही श्रद्धेची श्रेष्ठतम उंची आहे. भक्तीचे मूळ सर्वप्रथम आपल्याला ऋग्वेदातील वरुणसूक्तात वाचायला मिळेल. हे सूक्त वसिष्ठमुनींनी वरुणास उद्देशून म्हटलेले आहे. भक्तीला वेदांचा आधार आहे, तसाच ज्ञानमार्गी उपनिषदांचाही आधार आहे. ‘श्वेताश्वेतर उपनिषदा’त भक्तीचे प्रतिपादित श्लोक आपणांस वाचायला मिळतील. तसेच पाच आचार्य परंपरेची मुळे वेद व उपनिषदांमध्ये घट्ट रुजलेली आढळतात. अशा भक्तिसंप्रदाय उद्धारक पूर्णप्रज्ञ श्रीमत्मध्वाचार्य यांच्या कार्याचा व तत्त्वज्ञानाचा परिचयात्मक भाग पाहूयात.
 
आचार्यांचा जन्म उडुपीपासून जवळ असलेल्या पाजक क्षेत्रात शके १९९८ मध्ये विजयादशमीला झाला. वडिलांचे नाव मध्यगेह व आईचे नाव वेदवती असे होते. आचार्यांचे मूळ नाव वासुदेव. बालपणापासून कुशाग्र बुद्धी असल्याने त्यांचा विद्याभ्यास लवकर पूर्ण झाला. धर्मशास्त्र, श्रुती, उपनिषदे, व्याकरण तसेच, व्युत्पत्तिशास्त्रातही लहान वयात पारंगत झाले. तसेच आचार्यांनी अद्भुत अशा चमत्काराचा प्रत्यय दाखवला. श्री अच्युतप्रेक्ष यांच्याकडून संन्यास दीक्षा घेत ‘पूर्णप्रज्ञ’ हे नाव धारण केले. आचार्यांनी त्यांची तात्त्विक भूमिका निर्धारित करीत पूर्ण भारत भ्रमण केले. विशेषतः उत्तर व दक्षिण भारतात धर्मपरिक्रमा व द्वैत मताचा प्रसार करू लागले. यात मुख्यत्वे करुन इतर मतवाद्यांना वादात हरवत द्वैत मताची स्थापना केली व विशेषतः मायावादाचे खंडन केले. अनेक परमत विद्वानांचा पराभव केला. यात वादसिंह व बुद्धिसागर यांचा समावेश आहे. तिरुवनंपुरम येथे अद्वैत विद्वानांसोबत झालेल्या शास्त्रचर्चेत या विद्वत मंडळींचा पराभव केला आहे. या शास्त्रचर्चेतश्रीमध्वाचार्य यांनी ‘विश्व’ या शब्दाचे १०० अर्थ उलगडून दाखविले. पुढे बद्रीनारायण येथे गीताभाष्य लिहिले. कठोर तपस्या करत महर्षि वेदव्यास यांना प्रसन्न करून घेत त्यांच्या आदेशानुसार ‘ब्रह्मसूत्रा’वर भाष्य केले व या भाष्यात आधीच्या सर्व मतांचे खंडन केले. उत्तर भारताच्या यात्रेत मुस्लीम राजांशी उर्दूतून संभाषण केल्याचा उल्लेख त्यांच्या चरित्रात वाचण्यात आला आहे. पुढे उडुपीत असताना आचार्य समुद्रस्नानास गेले असता, त्यावेळी एक नाव समुद्राच्या वाळूत फसलेली होती. ती त्यांनी आपल्या अभुतपूर्व अशा सामर्थ्याने बाहेर काढली. त्यात गोपीचंदनाचे तीन खडे मिळाले. त्यात एका खड्यात बालगोपाळाची मूर्ती मिळाली. तिची स्थापना करुन त्यांनी उडुपी येथे काही स्तोत्रांची रचना केली, तसेच ‘ब्रह्मसूत्रा’वर व्याख्याने केली. तीच व्याख्याने ‘अनुव्याख्याने’ म्हणून प्रसिद्ध आहेत, तसेच ‘न्यायविवरण’ या ग्रंथाची रचना केली. आचार्यांचे आपल्यावर महत् असे उपकार आहेत. कारण, त्यांनीच भक्तिमार्गाचा उद्धार प्रथमतः केला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांनी प्रामुख्याने ३७ ग्रंथं लिहिले आहेत. त्यात ‘ब्रह्मसूत्रभाष्य’, ‘अनुव्याख्यान’, ‘गीताभाष्य’, ‘गीतातात्पर्यनिर्णय’, ‘भागवततात्पर्यनिर्णय’‘ऋग्वेदभाष्य’, ‘महाभारततात्पर्यनिर्णय’,‘तत्त्वविवेक’, ‘उपाधीखंडन’ इ. आहेत. सर्व वेदांचे तात्पर्य विष्णू हे सर्वश्रेष्ठ तत्त्व असून तोच परमात्मा आहे. तो जडजगत आणि चेतन जीव यांपेक्षा वेगळा असून सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वोत्तम गुणांनी परिपूर्ण आहे. जगत् हे सत्य असून भेद तत्त्व सिद्ध आहे. या तत्त्वाचे पाच प्रकार आहेत. जीवेश्वर भेद, जीवभेद, जडजडभेद, जीवजीवभेद, जडजीवेश्वर भेद. जीव परमेश्वराचे सेवक असून त्यांच्यात योग्यतेचे तारतम्य असते. निर्दोष भक्ती हाच मोक्षप्राप्तीचा उपाय असून तिच्यामुळे जीवांचा उद्धार होतो. स्वतःच्या वास्तवस्वरुपाची अनुभूती म्हणजे मोक्ष. प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द ही तीन प्रमाणे. आचार्य यांनी द्वैत मताच्या प्रचारासाठी आठ मठांची स्थापना केली. यात उत्तरादी मठ मुख्य असून तो स्वतंत्र मठ आहे, तसेच धर्मप्रसारासाठी व मतप्रचारासाठी तो फिरता आहे. आचार्यांचे प्रमुख चार शिष्य होते. त्यांची नावे-पद्मनाभतीर्थ, नरहरीतीर्थ, अक्ष्योभ्यतीर्थ, माधवतीर्थ. यापैकी आचार्यांच्या ग्रंथांवर पद्मनाभतीर्थ, नरहरीतीर्थ इ.शिष्यांनी टीका लिहिल्या. मात्र, आचार्यांच्या सर्व ग्रंथांवर पंढरपूरजवळील मंगळवेढ्याचे देशपांडे घराण्यातील धोंडो रघुनाथ यांनी टीका लिहिली, म्हणून त्यांना ‘टीकाचार्य’ संबोधले जाते. ‘टीकाचार्य’ हे नाव वेदांत क्षेत्रात ध्रुव तार्‍यासारखे आजही अढळ आहे.
 
श्रीमध्वाचार्यांच्या ‘अनुव्याख्याना’वर ‘न्यायसुधा’ नावाची टीका लिहिली व ही टीका द्वैत वेदांत तसेच वेदांताच्या क्षेत्रात सर्वात महत्त्वाची मानली जाते. याबरोबरच व्यासरायतीर्थ व राघवेंद्र स्वामी यांची टीकाही द्वैत वेदांतशास्त्रात प्रसिद्ध आहे. श्रीमध्वाचार्य यांनी भक्तीचा व उपासनेचा आग्रहाने पुरस्कार केला असला, तरी त्यांचा प्रतिपादित भक्तीसिद्धांत हा डोळस-विवेकी आहे. एका ठिकाणी ‘टीकाचार्य’ म्हणतात. मध्वमतानुसार, मोक्ष हा ईश्वरप्रसादावर आधारित असला, तरी भगवंत त्याचा आशीर्वाद व प्रसाद त्याच भक्तांवर करतो.ज्याला त्याचे ज्ञान यथार्थपणे होते. हे ज्ञान यथार्थपणे होण्यासाठी श्रुतींचे, शास्त्रांचे श्रवण, मनन करणे आवश्यक आहे. श्रीमध्वाचार्य हे प्रभावी तसेच तेजस्वी असे तत्त्वज्ञानी होते. त्यांनी भक्तिसिद्धांतास तार्किक पाठबळासह त्याची सुसंगत अशी मांडणी केली आहे. हे त्यांच्या बिनतोड युक्तिवादाने व धारदार तर्कसंगत अशा मांडणीने दाखवून दिले.
 
श्री आद्य शंकराचार्य, श्री रामानुजाचार्य, श्री वल्लभाचार्य, श्री निंबार्काचार्य व श्री मध्वाचार्य यांनी वेगवेगळी मतं मांडून प्रस्थानत्रयींवर भाष्यं लिहिली. कोणी केवलाद्वैत, विशिष्टाद्वैत, तर प्रस्थानत्रयींवर द्वैत मत-तात्पर्य म्हणून मांडले. यात टोकाचे मतभेद आहेत. सर्व जणांचे एकाबाबतीत एकमत ते म्हणजे ‘ब्रह्म सत्य आहे.’ तसेच श्रुतिशास्त्र, स्मृती यातील कोणताही भाग प्रक्षेपित मानला नाही. बाकी जगाचे मिथ्यात्व वा सत्यत्व यावर वाद झाले वा होतील, वा समोर चालूही राहतील, हेच भारतीय तत्त्वज्ञानाचे वैशिष्ट्य आहे. या सर्व आचार्यांची भूमिका समर्थांच्या भाषेत सांगायची तर...
 साधु दिसती वेगळाले।
परी ते स्वरुपी मिळाले ।
 या स्वरुपाची आहे किंवा श्री तुकोबाराय म्हणतात, त्याप्रमाणे -
काय सांगू संतांचे उपकार। मज निरंतर जागविती॥
 
आज अशा भगवद्भक्ताचा बद्रीगमन अथवा समाराधना दिवस आहे, म्हणून ही शब्दवाही सेवा श्री सद्गुरू प्रेरणेने व सर्व आचार्य प्रेरणेने घडले, अशी घडत राहो ही सद्गुरु चरणी प्रार्थना करतो. समारोप करताना मराठी माध्वभक्तांसाठी मध्वाचार्य यांच्या तत्त्वज्ञानाबद्दल तसेच जीवनाबद्दल जिज्ञासू भाविकांना जाणून घ्यायचे असल्यास आधुनिक महिपती संतकवी श्रीदासगणु महाराज विरचित ओवीबद्ध ‘सुमध्वविजय’ हे मध्वचरित्र तसे रा. बा.अवधानी यांनी लिहिलेलेे गद्यात्म चरित्र ‘मध्वाचार्य व तत्त्वज्ञान’ हे ग्रंथ वाचावेत. तसेच ‘देणे प्राणाशाचे’ वादिराज लिमये लिखित मध्वचरित्र हा ग्रंथसुद्धा आचार्य यांच्या तत्त्वज्ञानाबद्दल एक अनोखा पैलू सांगून जातो. प. पू. संतकवी श्री दासगणु महाराज शंकराचार्य चरित्रात (ओवीबद्ध) म्हणतात -
या चारी आचार्यांनी। परिस्थितीला पाहुनी।
आपुली मते स्थापुनि। उपासनेसी जीवविले।
एवंच पाचांनीहि केले। वैदिक धर्माचे संरक्षण।
हे पंचमुखी परमेश्वर। वा हे पाच पांडव साचार।
या पाचही जणांना नमस्कार। करणे भाग प्रत्येका।
(अध्याय ३७, ओवी १९८, ते २००)
 
हे सर्व आचार्य म्हणजे वैदिक धर्माचे पंचमुखी परमेश्वर वा पांडव आहेत. प्रत्येक हिंदूने यांना नमस्कार केलाच पाहिजे.
प्रथमो हनुमानच द्वितीयो भीम एवच ।
पूर्णप्रज्ञतृतीयस्तु भगवत् कार्य साधकः ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
- योगेश काटे
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121