पुणे : एसटी महामंडळाच्या पत्रानंतर ग्रामीण भागातील विविध मार्गांवरील ‘पीएमपीएमएल’ची बससेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय ‘पीएमपीएमएल’ प्रशासनाने घेतला होता. मात्र, ही बससेवा पुन्हा पूर्ववत करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘पीएमपीएमएल’चे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांना दिल्या असून, त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोना काळानंतर ‘पीएमपीएमएल’ प्रशासनाने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अनेक मार्गांवर आपली बससेवा सुरू केली होती. मात्र, जनजीवन पूर्वपदावर आल्यानंतर एसटी महामंडळाचीदेखील बससेवा पुन्हा सुरू झाली. त्यामुळे महामंडळाने पत्र लिहून सदर मार्गांवरील बससेवा बंद करावी आणि आपला उत्पनाचा स्रोेत पुन्हा देण्याची विनंती ‘पीएमपीएमएल’ प्रशासनाकडे केली होती. त्याअनुषंगाने ‘पीएमपीएमएल’ प्रशासनाने नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस ११ मार्गांवरील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला, तर डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला अजून १२ मार्गांवरील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला.
मात्र, ग्रामीण भागातील ‘पीएमपीएमएल’ची बससेवा सुरू ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत होती. त्याची दखल घेऊन ‘पीएमपीएमएल’चे संचालक ओमप्रकाश बोकोरिया यांना आज पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सदर भागातील बससेवा पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.