नवी दिल्ली : अँपल कंपनीचा आयफोन घेण्याचे स्वप्न बरेच जण बघत असतात पण याच अँपल कंपनीकडून जाहीर झालेला डेटा काहीतरी वेगळेच सांगतोय. भारतात अँपल फोन धारकांची संख्या वेगाने वाढत असून दर १० स्मार्टफोन्सधारकांमध्ये ४ जणांकडे आयफोन आहे अशी माहिती समोर आली आहे. अँपलच्या विक्री विभागाच्या म्हणण्यानुसार आयफोनची भारतात सर्वात जास्त मागणी नोंदवली गेली आहे. याच आकड्याबरोबर अँपलने भारतातील आतापर्यंत लोकप्रिय स्मार्टफोन कंपन्या सॅमसंग आणि वन प्लस या स्मार्टफोन्सना मागे टाकले आहे.
यावर्षी सर्वात जास्त मागणी नोंदवला गेलेला स्मार्टफोन म्हणून अँपलच्या आयफोनची नोंद झाली आहे. यावर्षीच्या सण - उत्सवांच्या काळात भारतात अँपल फोनची विक्री सर्वात जास्त झाली आहे. आश्चर्य म्हणजे अँपलच्या महागड्या फोन्सना म्हणजे ३० हजार आणि पुढे यांना असलेली मागणी वाढली आहे. हे सगळं बघता भारतात दिवसेंदिवस आयफोन्सची चलती वाढतच जाणार आहे असेच दिसत आहे.
अँपल इंडियाने यावर्षी ३ टक्के वाढीसह तब्बल १२६३ कोटींचा नफा कमावला. २०२२ या एका वर्षातच भारतात आयफोन्सची विक्री ४५ टक्क्यांनी वाढली आहे. भारतात असणारी आयफोन्सची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे, याचमुळे आयफोन्स निर्मिती करणारी कंपनी फॉक्सकॉन हिनेही आपला अँपल फोन निर्मितीचा प्रकल्प भारतात सुरु करण्याची तयारी सुरु केली आहे. भविष्यात या कंपनीकडून सर्वाधिक निर्मिती क्षमता असणारा प्रकल्प भारतात सुरु केला जाणार असल्याची शक्यता आहे. चीनमध्ये सुरु असलेल्या कोविड प्रतिबंधक उपायांच्या अतिरेकाने भारताला स्मार्टफोन्स निर्मितीच्या क्षेत्रात अग्रेसर बनण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.