मुंबई : 'जोपर्यंत तुम्ही आहेत. तोपर्यंत मी पक्षप्रमुख आहे. मात्र, जर कुणा एकही निष्ठावंत शिवसैनिकाने आक्षेप घेतला तर मी हे शिवसेना प्रमुख पदही मी सोडेन. ज्या लोकांना आपण पदे दिली ती सर्व मंडळी आपल्याला सोडून गेली. मात्र, ज्यांना काही दिल नाही ते आज माझ्यासोबत आहेत. हे माझं मी नशीब समजतो. शिवसेना ही कुणा एका व्यक्तीची नसून मर्द आणि एकनिष्ठांची आहे.,' असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
बुधवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी दादर येथील शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक मैदानावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचा दसरा मेळावा संपन्न झाला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे गटासह भाजपावरही आरोप केले. यावेळी मंचावर ठाकरे गटातील नेत्यांची उपस्थिती होती. मात्र, पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा प्रकर्षाने केंद्रस्थानी राहिला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, 'ज्याप्रमाणे रावणाने सन्याशाचे रूप घेऊन सीतेचे हरण केले होते, त्या प्रमाणे शिंदे गटातील लोक बाळासाहेबांचा चेहरा वापरून शिवसेना पळवत आहेत. सर्वांना बाजूला सारून तुम्हाला आमदार, खासदार,मंत्री केले मात्र तुम्हाला सत्तेची हाव सुटली होती. मुख्यमंत्री पद घेऊनही तुमची हाव संपली नसून तुम्हाला आता शिवसेनाप्रमुख व्हायचे आहे. तुम्ही मुख्यमंत्री आणि मंत्री हे थोड्या काळासाठी आहात. पण तुमच्या माथ्यावर लागलेला गद्दारीचा शिक्का तुम्ही गद्दार आहात हे कायम सांगत राहील. त्यामुळे शिंदे गट गद्दारच आहे हे सिद्ध झालेले आहे,' असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केला आहे.
आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न
उद्धव ठाकरे म्हणाले की, 'दसरा मेळाव्यानंतर यावर्षीही रावण दहन होणार आहे. मात्र, यंदाचा रावण जरा वेगळा असून तो ५० खोके घेणारा धोकासुर आहे. एकनाथ शिंदे हे कटप्पा आहेत. मात्र, त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी जोपर्यंत सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनात मी आहे तोपर्यंतच मी शिवसेना पक्षप्रमुख पदावर राहील. आज शिवाजी पार्कवर जमलेली गर्दी ही पैसे देऊन भाड्याने आणलेली नसून सच्चा कडवट शिवसैनिकांचा हा जनसमुदाय आहे. जनतेचा कौल डावलून शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आघाडी केल्याचा आरोप करणारी मंडळी आपल्या पाठीत केलेला वार विसरतात. भाजपने आपल्या पाठीत वार केला म्हणून राज्यात महाविकास आघाडी सरकराची स्थापना करावी लागली,' असे म्हणत ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या स्थापनेवर होणाऱ्या आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला.
पुन्हा तेच ते तेच ते.. नावीन्य काहीच नाही !
उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावर केलेल्या भाषणात नवीन मुद्द्यांचा अभाव दिसून आला. महाविकास आघाडीची स्थापना, भाजपवर टीका, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांवर आगपाखड, आम्ही हिंदुत्व सोडले नाही याचा वारंवार पुनरुच्चार, शिंदे गट म्हणजे बाप चोरणारी अवलाद, महागाई, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत टिप्पणी, शेंडी जानव्याचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही याचा पुन्हा पुन्हा उल्लेख, ५० खोके आणि यासारख्या वारंवार उल्लेख केलेलाच मुद्द्यांचा समावेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भाषणात होता. त्यामुळे ठाकरेंच्या भाषणात पुन्हा तेच ते तेच ते आल्याचे अधोरेखित झाले आहे.