विविध अंगांनी नटलेला कोकण प्रदेश ऐतिहासिकदृष्ट्या संपन्न आहे. कोकणातील गड किल्ल्यांवर दुर्गभ्रमण ही एक वेगळीच पर्वणी असते. या गडकिल्ल्यांपैकी काही दुर्लक्षित गडकिल्ल्यांची भौगोलिक आणि ऐतिहासिक माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
पावसजवळचा पूर्णगड
रत्नागिरी शहराच्या आसपास भटकंती करताना आपण थिबा पॅलेस, रत्नदुर्ग, गणपतीपुळे, पावस या ठिकाणी नेहमी जातोच. रत्नागिरीपासून 20 किमी अंतरावर पावसच्या स्वरूपानंद स्वामींचा मठ आपणा सर्वांना वेगळाच अनुभव देऊन जातो. तेथील शांतता आणि दुपारचा महाप्रसाद आपल्याला कायम स्मरणात राहतो. पावस - आडिवरे रस्त्यावर पावसपासून चार किमी अंतरावर गणेशगुळे गणपती मंदिर आहे. गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला, असे म्हटले जाते. पुढे दक्षिणेला पूर्णगड किल्ल्याच्या दिशेने एक रस्ता समुद्राला समांतर जातो.
पूर्णगड हा मुचकुंदी नदीच्या उत्तर काठावर, मुखाजवळ वसलेला आहे. एखाद्या पूर्णविरामाच्या आकाराचा आणि तुलनेने छोटा म्हणून किंवा शिवरायांनी या किल्ल्याच्या बांधकामानंतर दुर्गरचनेचे काम थांबविले म्हणजे पूर्णविराम घेतला म्हणून गडाचे नाव ‘पूर्णगड’ पडले असे म्हटले जाते. पूर्णगड गावातून दाट झाडीतून वाट राम मंदिर आणि महादेव मंदिराकडे जाते. या मंदिरांना जांभ्या दगडाची तटबंदी आणि दीपमाळा आहेत. या मंदिराशेजारून गडाकडे दगडी पायर्यांची वाट आहे. अवघ्या 15 मिनिटांत आपण गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराशी येऊन पोहोचतो.
दरवाज्याबाहेर हनुमानाचे मंदिर आहे. गडाचे बांधकामसुद्धा जांभ्या दगडातच केलेले दिसून येते. गडाच्या मुख्य दरवाज्यावर चंद्र, सूर्य, गणपती यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. दरवाजा आजही उत्तम स्थितीत पाहायला मिळतो. आत शिरल्यावर दोन्ही बाजूला देवड्या आहेत. गडावर मोठी सपाटी आहे. तटबंदीवर जायला बांधीव पायर्यांची वाट आहे. तटबंदीवरून गडावरील वास्तू आणि आजूबाजूचा परिसर न्याहाळता येतो. तटबंदीला तोफा किंवा बंदुकीचा मारा करण्यासाठी ठिकठिकाणी जंगी दिसतात. गडाला दोन दरवाजे आहेत. पश्चिमेकडील दरवाजा सागराच्या दिशेने उतरण्यासाठी बांधला गेला असावा. अंदाजे दहा फूट उंचीचा कमानयुक्त असा हा दरवाजा आहे. समुद्राकडील बाजूने हा दरवाजा नीट पाहता येतो. उत्तर दक्षिण पसरलेला हा किल्ला अगदी अर्ध्या तासात पाहून होतो. गडावर पाण्याची सोय नाही. पश्चिमेकडील तटाजवळ काही वाड्याचे अवशेष आहेत. तसेच, एक मोठे वृंदावनसुद्धा पाहायला मिळते. इ. स. 1724 मध्ये कान्होजी आंग्रेंनी पूर्णगड आणि जयगड हे दोन्ही किल्ले बांधले, अशी नोंद आंग्रे शकावलीत आहे. इ. स. 1732 मध्ये हा गड पेशव्यांच्या ताब्यात होता. इ.स. 1818 मध्ये इंग्रजांच्या ताब्यात हा किल्ला गेला.
पूर्णगड पाहून झाल्यावर गावखडीचे सुरुबन आहे. तिथे समुद्राच्या सान्निध्यात निवांत वेळ घालवायला मस्त वाटते. गावखडीपासून सात-आठ किमी अंतरावर कशेळीचे कनकादित्य (सूर्यमंदिर) आवर्जून पाहण्यासारखे आहे. अशाप्रकारे रत्नागिरीपासून 25-30 किमी परिसरातील ही सर्व ठिकाणे आपण एका दिवसांत सहज पाहू शकतो.
वेंगुर्ला तालुक्यातील दुर्गभ्रमंती
श्रावण महिन्यातील व्रतवैकल्ये सुरू झाली की, सगळ्यांनाच वेध लागतात ते गणपती उत्सवाचे. बरेच लोक या काळात आपल्या मूळ गावी कोकणात जातात. अनेकदा स्वतःचे वाहन असल्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक ठिकाणांना आपण भेट देत असतो. पर्यटन स्थळांसोबत सगळ्यांना सर करता येण्यासारखे जलदुर्ग, मिश्रदुर्ग या परिसरात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात निवती, वेंगुर्ला कोट आणि रेडीचा यशवंतगड असे तीन किल्ले आहेत.
निवतीचा किल्ला
तारकर्ली म्हणजे कर्ली नदी जिथे समुद्राला मिळते त्या खाडीच्या दक्षिणेला निवती हे गाव आहे. निवतीला कुडाळ किंवा मालवण वरून जाता येते. कुडाळपासून 22 किमी अंतरावर निवतीचा किल्ला आहे. शिवलंका किल्ले सिंधुदुर्ग म्हणजे मराठा आरमाराचे केंद्रच होते. महाराजांनी सिंधुदुर्गाच्या संरक्षणासाठी त्या भोवती दुर्ग साखळीच तयारी केली होती, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यापैकीच एक निवतीचा किल्ला! हा किल्ला नक्की कोणी बांधला याबद्दल माहिती उपलब्ध नाही. पण, इ.स. 1748 पूर्वी हा किल्ला सावंतवाडीच्या भोसल्यांकडे होता. पोर्तुगीजांनी हा किल्ला घेण्याचा प्रयत्न 1748 मध्ये केला. इ.स. 1788च्या सुमारास कोल्हापूरकरांनी निवती, वेंगुर्ला, भरतगड ही सावंतवाडीकरांची ठाणी जिंकून घेतली. इ.स. 1818 मध्ये बिटिशांचा अंमल येऊनही निवती, रेडी हे किल्ले सावंतांकडेच होते. पुढे इ.स. 1819 मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. निवती गावापासून 15 मिनिटांत आपण किल्ल्यावर पोहोचतो. गडावर फार थोडे अवशेष आहेत. पण गडावरून सूर्यास्ताचे दृश्य कायम मनात साठून राहते. गडाच्या पूर्वेकडील तटबंदीत तीन बुरुज आहेत. गडावर प्रवेश केल्यावर कोठार सदृश्य बांधकाम डावीकडे आहे. तटबंदीला जंगी आणि तोफा मारण्याच्या जागा आहेत. अनेक अवशेष झाडांमुळे झाकले गेले आहेत. गडाच्या सर्वोच्च ठिकाणाहून अथांग समुद्र, समुद्रातील जळलेले बेट आणि भोगवे समुद्र किनारा दिसतो. हिवाळ्यात निवतीच्या किनार्यावर किंवा किल्ल्यावर ‘युथ हॉस्टेल’चे आकाशदर्शनाचे कॅम्पसुद्धा होतात. तंबूत राहायची व्यवस्था गावातील लोकांतर्फे होऊ शकते.
वेंगुर्ल्याचा कोट - वेंगुर्ल्याची डच वखार म्हणजे एक भुईकोटच आहे. सावंतवाडी ते वेंगुर्ले हे अंतर 24 किमी आहे. येत्या काही वर्षात येथील अवशेष भुईसपाट होऊन जातील, अशी सध्याची परिस्थिती आहे. डच लोकांनी गोदामाच्या संरक्षणासाठी हा भुईकोट बांधला असावा. त्याच्या तटबंदीत तीन चौकोनी बुरुज आहेत. दरवाज्याच्या दोन्ही बाजूला नक्षीदार खांब आहेत. कोटात तीन मजली इमारत आहे. ती जांभा दगडात बांधलेली आहे. त्यावर चुन्याचे लेपन करून नक्षीकाम केले आहे. तीन मजली वखारीच्या परिसरात एक विहीर आहे. तसेच, पोर्तुगीज बांधणीचा एक जिना पाहायला मिळतो. इ. स.1636 मध्ये विजापूरच्या आदिलशहाची परवानगी घेऊन डचांनी येथे एक छोटी गढी उभारली. नंतर कोट बांधण्यात आला असावा. इ.स. 1660-63 च्या सुमारास शिवाजी महाराजांनी कोल्हापूर, कुडाळ मार्गे वेंगुर्ल्यावर हल्ला केला. या महाराजांच्या स्वारीचे वर्णन पोर्तुगीज व्हाइसरॉयने केले आहे. पुढे हा कोट पोर्तुगीज, इंग्रज आणि सावंतवाडीकर भोसल्यांच्या ताब्यात होता.
रेडीचा यशवंतगड
सावंतवाडीहून शिरोडा मार्गे रेडी हे अंतर 30 किमी आहे. रेडीचे गणेश मंदिर प्रसिद्ध आहे. रेडी गावातील सुकाळभाट परिसरात रेडीचा यशवंतगड आहे. या गडाला एकूण सहा दरवाजे, दोन तटबंदी आणि 13 बुरुज आहेत. पहिला दरवाजा पूर्वाभिमुख तर दुसरा उत्तराभिमुख आहेत. पाचव्या दरवाज्यावरील चौकोनी खांब आणि त्यावरील नक्षी पाहण्यासारखी आहे. गडाचा सहावा दरवाजा पश्चिमाभिमुख असून भव्य आणि लांब रुंद आहे. सहाव्या दरवाज्यातून आत सपाटी सुरू होते. पुढे तीन माजली इमारतीचे बांधकाम पाहायला मिळते. तटावरून चालताना किल्ल्याभोवतीचा खंदक दिसतो. रेडीच्या समुद्रकिनार्याचे विहंगम दृश्य दिसते. तटामध्ये काही शौचकूपही पाहायला मिळतात. तटबंदीजवळ एक आयताकृती विहीर आहे. किल्ल्यात खूप झाडी असल्याने अवशेष सहजासहजी दिसत नाहीत. अफझलखान वधानंतर महाराजांनी आपले सैन्य कोकणात पाठवले तेव्हा इ.स. 1662 साली हा यशवंतगड बांधून घेतला, असे सीरपव डफ म्हणतो. इ.स. 1746 मध्ये पोर्तुगीजांनी सावंतवाडीच्या भोसल्यांकडून हा गड जिंकून घेतला. पुढे इंग्रज, पोर्तुगीज, भोसले, पुन्हा इंग्रज अशा सर्व सत्ता या यशवंतगडाने अनुभवल्या.
- प्रा. अमेया जाध