अर्थव्यवस्थेला सणासुदीची संजीवनी! ग्राहकांचा खरेदीचा उत्साह

    14-Oct-2022
Total Views |
economy
 
मुंबई : भारतीय अर्थव्यवस्था जागतिक मंदीच्या धक्क्यांनी डगमगायला लागल्याचे वाटत असतानाच एक खुशखबर आली आहे. देशात सध्या सणासुदीचे वातावरण आहे. मुंबई, पुणे, अहमदाबाद, सुरत यांच्यासारख्या महत्वाच्या बाजारपेठा ग्राहकांनी फुलून गेल्या आहेत. यातून भारतीय अर्थव्यस्थेला जोरदार उभारी मिळून त्यातून मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा आहे. जगातील प्रमुख अर्थव्यवस्था जागतिक मंदीच्या भीतीने डगमगत असताना भारतात मात्र मंदीच्या सावटातून सावरत असल्याचे चित्र आहे. ग्राहकांच्या या उत्साहाला अजून एक किनार आहे ती कोरोना कालीन सर्व निर्बंधांतून मुक्तता मिळाल्याची. तब्बल दोन - अडीच वर्षांच्या खंडानंतर प्रथमच सर्व सण - उत्सव पुन्हा एकदा उत्साहात होत आहेत.
 
याआधी आलेले नवरात्र, त्याआधी गणेशोत्सव आणि आता येऊ घातलेली दिवाळी हे सर्वच हिंदूंच्या दृष्टीने महत्वाचे सर्वच सण एकामागोमाग येत असतात. दरवर्षी सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत स्थानिक तसेच मोठ्या घाऊक बाजारपेठांतही खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा होत असते. गेल्या दोन वर्षांत कोरोना निबंधांमुळे छोट्या तसेच मोठया विक्रेत्यांचे कंबरडेच मोडले होते. त्यातून सावरण्यासाठी यंदा या दिवसांकडे सर्वच जण डोळे लावून बसले होते. यंदा याकाळात होणाऱ्या उलाढालींमध्ये तब्बल २५ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.
 
 
गेली दोन वर्षे सर्व व्यवहार फक्त ऑनलाईन पद्धतींनींच चालू होते, त्यामुळे ऑनलाईन व्यवहारांनी विक्रेत्यांना थोडातरी दिलासा दिला होता. यंदा मात्र ऑनलाईन व्यवहारांबरोबरच ऑफलाईन व्यवहार मोठ्या प्रमाणावर होणार आहेत. प्रमुख ऑनलाईन खरेदी - विक्री प्लॅटफॉर्म्स असणाऱ्या फ्लिपकार्ट, अमेझॉन यांसारख्या कंपन्यांच्या ऑनलाईन सेल्सना याआधीच जोरदार प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे. याच बरोबरीने सर्व बाजारांमध्ये मालाची जोरदार आवक वाढली आहे.
 
 
साधारणतः असा अनुभव आहे की जरी एखाद्याला ३० हजार रुपये पगार असेल तर तो सणासुदीला ५० हजार रुपये खर्च करतो. नागरिकांची हीच सढळ हस्ते खर्च करण्याची वूत्ती लक्षात घेऊनच सर्व योजना आखल्या जातात. यंदा सर्वच क्षेत्रांत जोरदार मागणी दिसत आहे. मौल्यवान दाग- दागिने, वाहन खरेदी, गृहखरेदी, कापड खरेदी या सर्वच क्षेत्रांत जोरदार मागणी दिसत आहे. दुचाकींच्या मागणीत यंदा ५७ टक्क्यांची भर पडण्याचा अंदाज आहे. तसेच गृहखरेदी क्षेत्रातही मोठी वाढ अपेक्षित आहे. देशातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये गृहखरेदीत ७० टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.
 
 
जागतिक पातळीवर मंदीचे वारे वाहू लागलेले असताना भारतीय अर्थव्यवस्था समाधानकारक अवस्थेत आहे. सर्वच प्रमुख अर्थव्यवस्थानमध्ये चलनवाढीने कळस गाठला असल्याने व्याजदरांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. भारतातही रिझर्व्ह बँकेकडून अशीच सातत्याने व्याजदरांमध्ये वाढ केली आहे तरीही आलेली सणासुदीच्या काळाने अर्थव्यवस्थेवरील हे मंदीचे काळे ढग दूर होण्यास जरूर मदत होणार असल्याची अपेक्षा अर्थतज्ज्ञांकडून केली जात आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121