मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशनमध्ये खंडणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात इतर काही अधिकाऱ्यांचाही समावेश होता. या गुन्ह्याची चौकशी करणाऱ्या महाराष्ट्राच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) सोमवारी मोठा खुलासा करण्यात आला. श्याम सुंदर अग्रवाल यांना अडकवण्यासाठी संजय पूनमियाने विशेष सॉफ्टवेअर आणि व्हीपीएन वापरून छोटा शकीलचा या गँगस्टरचा आवाज काढल्याचे उघड झाले आहे.
फोन कॉलचा आवाज शकीलच्या आवाजाशी जुळण्यासाठी व तो कॉल खरा वाटावा म्हणून संजय पूनमियाने व्हीपीएनचा वापर केला होता. यामुळे हा कॉल कराचीमधून करण्यात आला असे दर्शविण्यात आले होते. यात पूनमियाने सायबर तज्ज्ञाची मदती घेतल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. सीआयडी या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच आरोपपत्रही दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे.