पुणे : "मुस्लीम मुलांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे. तेही इथलेच आहेत. त्यांच्यासाठी कामे करणे गरजेचे आहे," असे मत सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले आहे. मार्च महिन्यात पुण्यातील बहुली गावात आग लागली होती. यावेळी १६ घरे आगीत भस्मसात झाली. या १६ कुटुंबांना हक्काचे छप्पर देण्याचे काम नाना पाटेकर यांच्या 'नाम' फाऊंडेशनने केले आहे. यावेळी त्यांनी मुस्लीम मुलांविषयी आपले मत व्यक्त केले.
अभिनेते नाना पाटेकर यांनी म्हंटले आहे की, " प्रत्येकाने आपल्याला जमेल तितकी मदत करायची. काश्मीरमध्ये वॉटर बँक देऊन मुस्लिम मुलांना मुख्य प्रवाहात आणायचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांनाही मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मुस्लिम मुले ही आपलीच आहेत. दोन - तीन पिढ्यांपूर्वी ते कन्व्हर्ट झाले आहेत. सगळ्यांमधला माणूस शोधायला हवा, येणारा प्रत्येक जण हा जाणार आहे याच्यावर विश्वास ठेऊन चांगळे काम करायला हवे." असे मत त्यांनी व्यक्त केले.
पुढे त्यांनी म्हंटले आहे की, "माझ्या सातबाऱ्यावर खूप लोकं आहेत, मी हे नेहमी अभिमानाने सांगतो. आपण संपत्तीचा किती संचय करणार? 'एक दिवस जाणारच आहोत' यावर आपण कधी विश्वास ठेवणार? नामला आतापर्यंत खूप लोकांनी पैसे दिले आहेत. लोकांना विश्वास आहे की नामला दिलेल्या पैशांचा गैरव्यवहार होणार नाही. याची मला ग्वाही देण्याची गरज नाही. किंबहुना पडणारही नाही, त्यांचे पैसे योग्य कामाला लागतात हा लोकांना विश्वास वाटतो" असेदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे.