मुंबईतील सहकारी संस्थांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी दीड कोटींचा निधी
मुंबई : महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांना उभारी मिळावी, यासाठी मुंबईतील सहकार संस्थांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री साहाय्य निधीसाठी दीड कोटींचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते व मुंबई जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार, दि. १३ ऑगस्ट रोजी सुपूर्द करण्यात आला.
सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम दळवी, संचालक संदीप घनदाट, कॅप्टन अभिजित अडसूळ, शिवाजीराव नलावडे, विठ्ठल भोसले, भिकाजी पारले, अभिषेक घोसाळकर, सुनील राऊत, आनंदराव गोळे, सिद्धार्थ कांबळे, अनिल गजरे, जयश्री पांचाळ, नंदकुमार काटकर, जिजाबा पवार, सोनदेव पाटील, विनोद बोरसे, नितीन बनकर, संजय कदम, संचालिका कविता देशमुख, शिल्पा सरपोतदार, कार्यकारी संचालक डी. एस कदम, उप सरव्यवस्थापक संदीप सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, “जेव्हा मला उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला, त्यावेळी मुंबईतील सहकारी संस्थांच्या वतीने माझा जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पूरपरिस्थितीचे संकट असल्यामुळे सत्कार करण्यापेक्षा पूरग्रस्तांना सहकार्य करा, असे आवाहन मी केले होते. आज मला आनंद वाटत आहे की, मुंबईतील सहकारी संस्थांनी इतका प्रतिसाद दिला की, तीन दिवसांत दीड कोटींचा निधी जमा करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव नलावडे यांनी १.५ कोटी जमविण्याकरिता विशेष मेहनत घेतली,” असेही दरेकर यांनी सांगितले.