
नाशिक : गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे सर्वच क्षेत्रात आणीबाणी निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. यास पंचवटीतील तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या रामकुंड आणि लगतच्या गोदाघाट परिसर देखील अपवाद नव्हता. या काळात अनेक निबंध आल्याने परिसरातील लहान मोठे व्यावसायिक , दुकानदार यांच्यासह हातावर काम करणाऱ्या प्रत्येक वर्गाचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने रामकुंड तीर्थक्षेत्री सुरू असलेले अर्थचक्र ठप्प झाले होते. मात्र आता काही प्रमाणात करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने पुन्हा एकदा रामकुंड आणि लगतच्या गोदाघाट परिसरातील अर्थचक्राला गती मिळाली आहे.
रामकुंड तीर्थक्षेत्र असल्याने कायमच भाविक , पर्यटकांची वर्दळ असते . या भागातून गोदावरी नदी प्रवाहित होत असल्याने या गोदेच्या तीरावर धार्मिक विधी करण्यास देखील महत्त्व आहे. प्रसिद्ध श्री काळाराम मंदिर , कपालेश्वर महादेव मंदिर , श्री नारोशंकर , गंगा गोदावरी , सांडव्यावरची देवी अशी असंख्य लहान मोठी प्रसिद्ध मंदिर असल्याने शहराच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्तगणदेखील येत असतात . यामाध्यमातून परिसरातील हॉटेल पूजा साहित्य , प्रसाद , फूल विक्रेते , धर्मशाळा , लॉजिग , सलून , रिक्षाचालक , गाईड , कपडे , कटलरी साहित्य यासारखे अनेक लहानमोठे दुकानदारांचा व्यवसाय सुरू राहून अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह याच माध्यमातून वर्षानुवर्षे सुरू आहे.
यातून परिसरातील अर्थचक्र फिरत असते . मात्र गेल्या दिडवर्षांपूर्वी आलेल्या करोनामुळे अनेक निबंध लागले . पर्यटनासाठी , बंदी आली.धार्मिक मंदिरे अद्यापही खुली नाही झाली.अनेक दिवस लॉकडाऊन असल्याने स्थानिक व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प होऊन आर्थिक नियोजन कोलमडले . त्यातच हातावर कमविणारे आणि आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्याचे प्रचंड हाल झाले . मागील वर्षीच्या दिवाळीच्या दरम्यान काही प्रमाणात करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन परिस्थिती आटोक्यात येईल या आशेवर असलेल्या स्थानिक दुकानदारांना काही प्रमाणात दिलासा मिळत असतानाच गत मार्च महिन्यात करोनाची दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागला . यावेळी देखील शासनाकडून वेळोवेळी निर्बंध घालण्यात आले .
यात सातत्याने बदल होत असल्याने स्थानिक व्यावसायिकांच्या चिंतेत अधिकच भर पडल्याचे चित्र होते . मात्र गेल्या दोन महिन्यांपासून प्रादुर्भाव कमी होऊन रुग्णांची संख्या कमी होत असल्याने शनिवार आणि रविवार विकेंड लॉकडाऊन वगळता इतर वेळी व्यवसाय सुरू राहत असल्याने स्थानिक व्यावसायिकाची चिंता काही प्रमाणात का होईना दूर होत आहे . '