ठाणे : ठाणे महापालिकेच्या ज्येष्ठ व दिव्यांगाच्या मोबाईल लसीकरण कार्यक्रमात निमंत्रणच नसल्याने कार्यक्रमस्थळी शिवसेना व राष्ट्रवादीचे मानापमान नाट्य पहायला मिळाले. सोमवारी सकाळी महापालिका मुख्यालयाच्या समोरच मोबाईल लसीकरणाचे उदघाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महापौर नरेश म्हस्के, पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा दाखल झाले होते, त्याचवेळी सभागृह नेते अशोक वैती आणि परिवहन सदस्य मुख्यालयात आले असता त्यांना कार्यक्रमाची माहिती नव्हती. त्यामुळे काही वेळ वैती यांनी थेट पालिका आयुक्तना विचारणा करून नाराजी व्यक्त केली.
ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील जेष्ठ नागरिक व ४५ वर्षावरील अपंगासाठी कोविड-१९ मोबाईल लसीकरण सुविधेच्या माध्यमातून त्यांच्या घराजवळ लस देण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला.या कार्यक्रमाला जेष्ठांना डावलल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान कार्यक्रम स्थळी सेनेच्या अशोक वैती यांनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत, आम्हाला मोबाईल लसीकरणाचा कार्यक्रम का सांगितला नाही असा जाब मनपा आयुक्त डॉ विपीन शर्मा यांना विचारला. दरम्यान, आयुक्त शर्मा यांनी त्वरित पालिका उपायुक्त संदीप माळवी यांना बोलावून चर्चा करून तोडगा काढत वैती यांची नाराजी दूर केली, आणि कार्यक्रम आटोपता घेतला.