राधानगरी अभयारण्यातून गोगलगायीच्या नव्या प्रजातीचा शोध; देवराईत अधिवास

    30-Jun-2021   
Total Views | 265
snail_1  H x W:


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
कोल्हापूर जिल्ह्यातील 'राधानगरी वन्यजीव अभयारण्या'मधून गोगलगायीच्या नवीन प्रजातीचा शोध लावण्यात संशोधकांना यश मिळाले आहे. ही प्रजात 'पेरोटेटीया' या पोटजातीमधील असून ११७ वर्षांनंतर या पोटजातीमधून एका प्रजातीचा उलगडा झाला आहे. राज्यातून याच आठवड्यात गोगलगायीच्या दोन नवीन प्रजातींचा शोध लागला आहे.
 
 
 
निसर्गामध्ये होणाऱ्या अत्यंत सूक्ष्म बदलांचा परिणाम हा गोगलगायींवर होत असतो. त्यामुळे बदलणाऱ्या निसर्गाचे संकेत देणाऱ्या दूत या गोगलगायी आहेत. शिवाय त्यांना निसर्गातील सफाई कामगारही म्हटले जाते. कारण, कुजलेला पालापाचोळा आणि मृत किटकांच्या अवशेषांवर त्या जगतात. गोगलगायी या अनेक प्राणी आणि पक्षी प्रजातींचे खाद्य आहे. पावसाळ्यात खास करुन अनेक प्रकारच्या गोगलगायी आपल्याला दिसतात. आता यामध्ये एका नव्या प्रजातीची भर पडली आहे.
 
 
 
राधानगरी अभयारण्याच्या दाजीपूर वनपरिक्षेत्रामधील उगवाई देवी मंदिर परिसरातील देवराईमध्ये गोगलगायीची नवीन प्रजात सापडली आहे. तिचे नामकरण 'पेरोटेटीया राजेशगोपाली', असे करण्यात आले आहे. ही प्रजात मासंभक्षी असून आजूबाजूला मिळणाऱ्या इतर गोगलगायींना ती फस्त करते. कराडमधील ‘संत गाडगे महाराज महाविद्यालया’तील प्रभारी सहाय्यक प्राध्यापक डाॅ. अमृत भोसले, ‘ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन’चे प्रमुख आणि संशोधक तेजस ठाकरे आणि बेन रोव्हसन यांनी नव्या प्रजातीचा उलगडा केला आहे. या शोधाचे वृत्त बुधवारी 'आर्किव्ह फर मोलुस्केंकुंदे' या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाले.
 
डॉ. राजेश गोपाळ )
snail_1  H x W:
 

भोसले यांना ही प्रजात सर्वप्रथम २०१८ साली सर्वेक्षणदरम्यान दिसली होती. २०१९ मध्ये 'ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन’चे सदस्य स्वप्निल पवार, अक्षय खांडेकर आणि विनोद आडके यांनी भोसलेेंना या प्रजातीचे नमुने गोळा करण्यास मदत केली. त्यानंतर तिन्ही संशोधकांनी या नमुन्यांतील शंखाचा आकारशास्त्रीय अभ्यास आणि रिप्रॉडक्शनसिस्टमचे निरिक्षण केल्यानंतर ही प्रजात विज्ञानासाठी नवीन असल्याचे त्यांना समजले. ही प्रजात 'पेरोटेटीया' या पोटजातीमधील असून त्यामधील शेवटची प्रजात ही १९०३ साली शोधल्याची माहिती भोसले यांनी दिली. त्यानंतर आता जवळपास ११७ वर्षानंतर 'पेरोटेटीया' पोटजातीमधून एक प्रजात उलगडण्यात आली आहे. महाराष्ट्रात या पोटजातीमध्ये एकूण १४ प्रजाती सापडतात.
 
 
 
नव्याने शोधलेली 'पेरोटेटीया राजेशगोपाली' ही प्रजात प्रदेशनिष्ठ आहे. भारतामधील व्याघ्र संशोधनामध्ये उल्लेखनीय काम करणारे डॉ. राजेश गोपाळ यांच्या नावावरुन या प्रजातीचे नामकरण करण्यात आले आहे. 'पेरोटेटीया राजेशगोपाली' ही २ सेंटीमीटरपेक्षा लहान आकाराची गोगलगाय आहे. तिच्या शंखाचा रंग पांढरा, शरीराचा पिवळसर आणि स्पर्शकांचा रंग केशरी आहे. 'ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन’मार्फत हा संशोधन प्रकल्प पूर्ण करण्यात आला. 
 
 
 
‘ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन’ आणि डाॅ.अमृत भोसले यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘सह्याद्रीतील गोगलगायी’ या प्रकल्पामधील हे पहिलेच संशोधन आहे. काही वर्षांपूर्वी मी पश्चिम घाटामध्ये गोड्या पाण्यातील खेकड्यांच्या संशोधनासाठी राबविलेले माॅडल या गोगलगायींच्या संशोधनासाठी राबवणार आहे. पश्चिम घाटाला धोका असलेल्या प्रत्येक घटकापासून या जैवविविधतेने परिपूर्ण असलेल्या जागेचे संरक्षण करण्यासाठी आम्ही येथील प्रत्येक जागा धुंडाळून तेथील जीवांचे नमुने गोळा करुन नव्या पोटजाती आणि प्रजाती उलगडण्याठी प्रयत्नशील राहणार आहोत. गोगलगायींसारख्या छोट्या प्रजातींचे संशोधन करण्यासाठीचा हा योग्य काळ आहे. - तेजस ठाकरे, संशोधक
 
 
 
 

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121