मुंबई : काँग्रेसचे नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी चिंतन मंथन बैठकीत 'वाघ आमच्या इशाऱ्यांवर चालतो' असे म्हणत जोरदार टोला लगावला. यानंतर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे हे एक वाघ नाना पटोले यांच्याकडे पाठवा असं म्हणाले. याच पार्श्वभूमीवर आता भाजप खासदार नारायण राणेंनीही शिवसेनेवर टीका करायची संधी साधली.
नारायण राणेंनी ट्विट करत,"सन्माननीय मंत्री महोदय विजय वडेट्टीवार हे असे म्हणाले की, आम्ही बोलतो त्याप्रमाणे वाघ चालतो. म्हणजे नक्कीच हा वाघ सर्कशीतीलच असला पाहिजे आणि यांचा रिंगमास्टर वेगळाच असणार!", असं म्हणत शिवसेनेला टोला लगावला.
तत्पूर्वी, नितेश राणेंनीही शिवसेनेला टोला लगावला होता. नितेश राणेंनी ट्विट केले की,"मंत्री महोदय म्हणतात, आमच्या इशाऱ्यावर वाघ चालतो...इशाऱ्यावर चालणारा वाघ एकतर सर्कस मध्ये असतो..नाहीतर तो वाघच नसतो..त्याला पालतू कुत्रा म्हणतात!! बाकी समझदारोंको इशारा काफी है!!!" असे म्हणत शिवसेनेवर निशाणा साधला होता.
लोणावळ्यात आयोजित ओबीसी चिंतन बैठकीत विजय वडेट्टीवार भाषण करताना म्हणाले की,"मी अशा भागातील राहतो जेथे भरपूर वाघ आहेत. त्यामुळे मी माझ्या खात्यात पैसे आले तर परत जाऊ देणार नाही." यावर व्यासपीठावर बसलेल्या भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक वाघ नाना पटोले यांच्याकडेही पाठवा असं सांगितलं. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी," आम्ही वाघ पाठवू, पण तो वाघ आमच्याच इशाऱ्याने चालतो. कारण तो आमचा वाघ आहे," असं म्हणत अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला टोला लगावला. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला होता.