मुंब्रा बायपास धबधब्यावर विकेण्डला झुंबड
ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी यांनी तलाव,पर्यटन स्थळ,पिकनिक पॉईंट,धबधबे व किनारपट्टी या ठिकाणी पावसाळी पर्यटनाला बंदी घातली आहे.असे असताना नियम धाब्यावर बसवुन पर्यटक धबधब्यावर जात आहेत.ठाणे शहराच्या नजिक असलेल्या मुंब्रा बायपास धबधब्यावर विकेण्डला झुंबड उडाल्याचे दिसुन आले.जिल्हा प्रशासनासह स्थानिक पोलीसांचे याकडे दुर्लक्ष होत असून यामुळे कोरोना संक्रमणात भर पडण्याची भीती व्यक्त होत आहे.
ठाण्यातील मुंब्रा येथे मुंब्रादेवी डोंगरावर निसर्गरम्य परिसर व कोसळणारे लहान धबधबे आहेत. पावसाळ्यात याठिकाणी दररोज तसेच,विकेण्डला सुट्टीच्या दिवशी या धबधब्यावर पर्यटक गर्दी करतात.सध्या कोरोनाचा काळ असल्यामुळे राज्यात जमावबंदीचा आदेश लागू आहे.शिवाय ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी धबधबे, नद्या,तलाव आणि पर्यटनस्थळे या सर्वच ठिकाणी नागरिकांना मनाई करण्यात आलेली आहे.तरीही या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळले जात नसून, एकाही नागरिकाने मास्क घातलेला नव्हता.यामुळे मुंब्र्यात जमावबंदीचे आदेश किंवा पर्यटनस्थळांवर जाण्यास मनाई आदेश लागू होत नाही का ? अशा पद्धतीने नागरिक कायदा मोडून महामारीच्या काळात एकत्र जमत असतील आणि कोरोना संदर्भातले कोणते नियम पाळत नसतील तर तिसर्या लाटेची शक्यता नाकारता येत नसल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.