ज्येष्ठ लेखिका आणि व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख या उद्या दि. २१ जून रोजी ९६ वर्षांच्या होत आहेत. त्यानिमित्त प्रा. बाळकृष्ण कवठेकर यांनी शेखबाईंशी संबंधित काही आठवणींना दिलेला हा उजाळा...
पुण्यात राहायला आल्यावर अंतर्बाह्य शुचिर्भूत असणार्या भानू काळे यांच्याशी असणार्या माझ्या परिचयाचे रूपांतर स्नेहात झाले. सज्जनतेने मानवी रूप धारण केले तर ती कशी दिसेल, असे कोणी मला विचारले, तर मी क्षणाचाही वेळ न लावता मी सांगेन, “भानू काळे यांच्या सारखी.” अशा भानू काळे यांनी एकदा मला त्यांच्या घरी जेवायला बोलावले. मी त्यांच्याकडे गेल्यावर ते म्हणाले, “शेखबाईही येणार आहेत. चला आपण त्यांना घेऊन येऊ.” शेखबाईंचे घर जवळच होते. पण, या वयात त्यांना चालायला लागू नये म्हणून माझी गाडी घेतली आणि चार-पाच मिनिटांत आम्ही शेखबाईंच्या घरी गेलो. बेल वाजवल्यावर त्यांनीच दार उघडले. ज्ञानाचे तेज असणारे प्रसन्न वार्धक्य समोर उभे होते. न कळत माझी आईच समोर उभी आहे, असे मला वाटले. मी खाली वाकून त्यांना नमस्कार केला. “अहो, हे कशाला,” बांगड्यांच्या किणकिणाटासारख्या आवाजात त्या म्हणाल्या. मी बीएला असताना त्या काही काळ औरंगाबादला मिलिंद महाविद्यालयात प्राध्यापक होत्या व त्यावेळी औरंगाबादला दोनच कॉलेजेस होती. एक आमचे शासकीय व दुसरे मिलिंद. स्पर्धा, चुरस होती.
पण, द्वेष नव्हता. दोन्हीकडे नामवंत प्राध्यापक होते. त्यामुळे मी म्हणालो, “तुम्ही आमच्या मॅडम.” मग थोडा वेळ बसलो. स्वच्छ, नीटनेटके घर. काळे म्हणाले, “सगळी कामे बाई स्वतः करतात. दुपारी झोपत नाहीत.” बाई लगेच तयार झाल्या आणि आम्ही भानू काळे यांच्या घरी आलो. थोडा वेळ बैठकीत बसलो. वर्षा काळे यांनी “चला,” असे म्हटले आणि आम्ही स्वयंपाकघरात आलो. टेबलावर एका बाजूला भानू काळे, दुसर्या बाजूला शेखबाई व मध्ये मी असे बसलो. जेवणात वर्षाताईंच्या पाककौशल्याची प्रचिती देणारे पदार्थ होते. पण, मला त्यापेक्षा शेखबाईंचे बोलणे ऐकण्यात आणि त्यांच्या वागण्याचे निरीक्षण करण्यात अधिक रुची होती. अनेक विषय निघत होते. शेखबाई म्हणाल्या, “खरे तर मला मुसलमानाशी लग्न करायचे नव्हते.” तेव्हा मला समजले की, शेखबाई जन्माने ज्यू होत्या. कोण कोणत्या धर्माचा आहे, जातीचा आहे, यात मला थोडासाही रस नाही. माणुसकी असणारा माणूस मला महत्त्वाचा वाटतो. पण, आंतरधर्मीय विवाह केलेल्या स्त्री-पुरुषांबद्दल, त्यांच्या सहजीवनाबद्दल मात्र मला कुतूहल वाटते. त्यातही मी शेखबाईंच्या, रूपाने ज्यू व्यक्ती पहिल्यांदाच पाहत होतो.
केतकरांच्या ‘ब्राह्मणकन्या’मध्ये प्रथम आणि नंतर विश्राम बेडेकरांच्या ‘रणांगण’मध्ये हॅर्टाच्या रूपाने मी मराठी कादंबरीत ज्यू स्त्री-पुरुषांचे चित्रण वाचले होते. पण, प्रत्यक्षात मात्र प्रथमच एक ज्यू व्यक्ती पाहत होतो. वागण्या-बोलण्यातले किंबहुना, कोणत्याही कृतीतले एवढे मार्दव मी यापूर्वी पाहिले नव्हते. भानू काळे तर शेखबाईंच्या मुलीचे शाळेतील वर्गमित्र; त्यामुळे त्यांच्याविषयी शेखबाईंना प्रेम वाटणे स्वाभाविकच होते. पण, नुकतीच ओळख झालेल्या माझ्याशीही शेखबाई तितक्याच प्रेमळपणाने वागत, बोलत होत्या आणि त्यात तिळमात्रही कृत्रिमता नव्हती. शेखबाईंच्या वागण्या, बोलण्यात, आठवणी सांगण्यात निर्मळ सहजता होती आणि त्यामुळेच ते सगळेच खरे, जसे आहे तसे वाटत होते. कसलाही आव किंवा आविर्भाव नसणारे वाटत होते. त्यामुळे मी अधिकच प्रभावित होत होतो. नेमके काय बोलणे झाले हे मला आता आठवत नाही. आठवते ते शेखबाईंचे निर्मळ आणि मनापासूनचे असणारे वागणे, बोलणे आणि त्यातून प्रकट होणारे त्यांचे अकृत्रिम, सहज सुंदर व्यक्तिमत्त्व. व्याकरणासारख्या अवघड व रुक्ष विषयात तज्ज्ञ असणार्या या निवृत्त ज्येष्ठ प्राध्यापिका जेवणाची रंगत वाढवणार्या हलक्या फुलक्या गप्पागोष्टी सहजपणे करत होत्या, तेही वयाच्या ९२-९४व्या वर्षी. हे सगळेच मला नवीन व स्तिमित करणारे होते. विद्वत्तेची शाल इतक्या सहजपणे वागवणारी अशी विदूषी मी प्रथमच पाहत होतो!
त्यानंतरच्या दिवाळीच्या फराळासाठी भानू काळे यांच्याकडेच शेखबाईंची माझी भेट झाली. यावेळी लातूरच्या ‘विवेकानंद हॉस्पिटल’चे संस्थापक डॉ. कुकडे होते. पुन्हा एकदा शेखबाईंचे ते आणि तसेच दर्शन घडले.सुसंस्कृत, शालीन, शिष्टाचारसंपन्न, मराठी व्याकरणतज्ज्ञ प्राध्यापक. शेखबाई या जन्माने ज्यू. त्यांचे माहेरचे आडनाव जेरुशा रुबेन. वडील सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीस. सतत फिरतीची नोकरी. त्यांनी नाशिकला घर बांधले होते. पण, मुलींना उच्चशिक्षणासाठी पुण्याला ठेवलेले होते. जेरुशा स. प. महाविद्यालयात होत्या. बापूसाहेब माटे यांच्या त्या लाडक्या विद्यार्थिनी. माटे त्यांना अनेकदा घरी बोलावत. त्यांच्या पत्नीने केलेले खाद्यपदार्थ पाटावर बसवून प्रेमाने खायला देत. हे शेखबाईंनीच मला सांगितले. बापूसाहेब आणि जेरुशा या दोघांच्याही वेगळेपणाचे दर्शन घडवणारे, १९३०-४० या काळातील पुणे लक्षात घेता विशेषच!
मध्यंतरी प्रसिद्ध विचारवंत दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या एका लेखात बापूसाहेब माटे हे शेखबाईंना, “मी तुला सून करून घेतले असते,” असे म्हणाले होते, असे वाचले. मला मोठेच कुतूहल वाटले. मी शेखबाईंना याबद्दल फोन करून विचारले. तेव्हा त्यांनी जे सांगितले, ते रोचक उद्बोधकही होते. शेखबाई म्हणाल्या, “अहो, माझे एका कोकणस्थ ब्राह्मण मुलावर प्रेम होते. काही काळानंतर त्या मुलाने मला सांगितले की, माझ्या आईला हे मान्य नाही. आपण पुढे जाणे नको. (मला त्या कोकणस्थ ब्राह्मण मुलाच्या करंटेपणाची या वयातही कीव करावी असे वाटले.) म्हणून मी कॉलेजच्या कॉरिडोरमध्ये रडत उभी होते. माटे तिथून जात होते. त्यांनी मला “का रडतेस?” असे विचारले. मी कारण सांगितल्यावर ते म्हणाले, “माझा मधू जर मोठा असता आणि तुम्हा दोघांची मने जुळली असती तर मी तुला आनंदाने माझी सून करून घेतले असते.” शेखबाईंचा प्रामाणिकपणा आणि माट्यांचा जातिधर्माच्या पलीकडे जाणारा स्वभाव या दोन्हींचे दर्शन या प्रसंगातून घडते. आणखी एक म्हणजे, हे फोनवरील बोलणे ऐकताना, मला जाणवले की, बाईंचा आवाज लहान मुलीसारखा आहे.
मी त्यांना बोलून दाखवले, तेव्हा त्या म्हणाल्या, “अहो, एकदा असेच झाले, फोन आल्यावर मी बोलू लागले, तर तिकडून ते म्हणाले, बाळ, तुझ्या आजीला फोन दे, त्यांच्याशी मला बोलायचे आहे.” हे सगळे ऐकताना माझ्या मनात येते होते, या बाई किती तटस्थपणे स्वतःच्या गतजीवनाकडे पाहत आहेत. यालाच तर साक्षीभावाने जगणे म्हणत असतील ना! शेखबाई मराठीतच नव्हे, तर सर्वच विषयांत सर्वाधिक मार्क्स मिळवून स. प. महाविद्यालयातून बीए झाल्या. बीए झाल्यानंतर त्यांना एमएसाठी फेलोशिप मिळाली होती. पण, आजारपणामुळे त्यांना नाशिकला वडिलांबरोबर जावे लागले. तिथे एमएसाठी पुस्तके कुठे मिळतील, हे विचारण्यासाठी त्या वडिलांबरोबर नाटककार वसंत कानेटकर यांच्या निवासस्थानी गेल्या. वाटेत पाऊस लागला, त्यात त्या भिजल्या. तशा अवस्थेतच त्या कानेटकर यांच्या घरी गेल्या. कानेटकरांना या मुलीच्या ज्ञानलालसेचे कौतुक वाटले. त्यांनी जेरुशाला पुस्तके तर मिळवून दिलीच. पण, नंतर डॅडी शेख नावाच्या उमद्या तरुणाशी ओळखही करून दिली. शेखसाहेबांमुळेच जेरुशाचा लेखाच्या सुरुवातीला दिलेला विचार बदलला आणि कानेटकरांच्याच पुढाकाराने डॅडी शेख यांच्याशी त्यांचा विवाह झाला. शेखसाहेबांच्या बहिणीने जेरुशाचे नाव ‘यास्मिन’ असे ठेवले. सुगंधी आणि नाजुक फुलाचे हे नाव तिच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे असेच होते.
एमए झाल्यावर मुंबईच्या शीव येथील एसआयईएस कॉलेजात शेखबाई मराठीच्या प्राध्यापक झाल्या. मार्मिक साहित्यदृष्टीला व्यासंगाची जोड असणारे थोर संपादक व समीक्षक श्री. पु. भागवत हे त्यांचे विभागप्रमुख होते. त्यांनी शेखबाईंना ‘भाषाशास्त्र’ आणि ‘व्याकरण’ हे विषय अध्यापनासाठी दिले. शेखबाईंनी अभ्यास करून ते शिकवले. व्यासंगाने या विषयाच्या तज्ज्ञ अशी कीर्ती संपादित केली. त्याच कॉलेजमध्ये विंदा करंदीकर हे इंग्रजीचे प्राध्यापक होते. अशा नामवंतांबरोबर काम करून नाव मिळवणे सोपे नव्हते. ते शेखबाईंनी मिळवले हे त्यांचे मोठेच यश मानावे लागते. शेवटची सात वर्षे त्या मराठी विभागप्रमुख होत्या. ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ आणि ‘मराठी शब्दलेखन कोश’ ही त्यांची दोन पुस्तके मराठीच्या अध्यापक, प्राध्यापकांसाठी अत्यंत महत्त्वाची व उपयुक्त अशी आहेत. मराठी लेखन शुद्ध असावे, याकडे त्यांचे सतत लक्ष असते. त्यांचा बोलीभाषांना मुळीच विरोध नाही. पण, लेखन प्रमाणभाषेतच केले जावे, असा त्यांचा आग्रह असतो. अहिराणीत लिहिलेले कोकणातल्या वाचकांना कसे समजणार आणि वर्हाडीत लिहिलेले अन्य भागातील लोकांना कसे समजणार, असा त्यांचा प्रश्न असावा. काही अधिकृत बदल होत नाहीत, तोपर्यंत महामंडळाचे शुद्धलेखनाचे नियमच पाळले पाहिजेत, असे त्यांचे मत आहे.व्याकरण, भाषाविज्ञानाचा व्यासंग करूनही शेखबाईंची रसिकता बाधित झालेली नाही. वृत्तीची सुकुमारता कमी झालेली नाही आणि याचा मी अनुभव घेतलेला आहे. मी ‘अंतर्नाद’च्या एका अंकात ‘मृत्यू आणि अश्रू’ या नावाचा लेख लिहिला होता. त्यात मी, माझे आई, वडील व पत्नी यांच्या निधनानंतर लगेच अश्रू आले नव्हते. प्रत्येक वेळी त्यासाठी काही पूरक कारण घडावे लागले होते, असे दाखवणारे अनुभवकथन लिहिले होते. शेखबाईंनी ते वाचून सहृदयपणे त्याची पटण्यासारखी कारणमीमांसा केली होती.
‘कार्यनिष्ठा’ हा शेखबाईंचा आवर्जून उल्लेखावा असा गुणविशेष आहे. महाविद्यालयातील अध्यापन त्यांनी त्याच निष्ठेने केले. ‘अंतर्नाद’ मासिकाच्या त्या व्याकरण सल्लागार होत्या. त्या नात्याने ‘प्रूफ’ तपासण्याचे काम करत असत. काळे यांनी मला सांगितले की, “याबाबतीतील त्यांची कार्यनिष्ठा इतकी की, शेखसाहेब आजारी होते. त्यांना आयसीयुमध्ये ठेवण्यात आले होते, तर बाई तिथे बसल्या असतानाही ‘प्रुफे’ तपासण्याचे काम करत होत्या. ही कार्यनिष्ठा केवळ अलौकिकच!” काळे हे सांगत असताना इकडे माझे डोळे पाणावत होते. ‘शेख’ या आडनावामुळे बाईंना काही कटू अनुभवांना सामोरे जावे लागले, असे काळे यांनी नमूद केले आहे. आपल्या समाजात तसे होणे अगदी स्वाभाविक आहे. पण, काळे यांनी पुन्हा जर शेखबाईंवर लेख लिहिला तर त्यांना मी असे सुचवेन की, त्यांनी ‘शेख’ या आडनावामुळेच माझ्यासारख्या एक अभ्यासू चाहता शेखबाईंना मिळाला, असे अवश्य लिहावे!
अशा या प्रा. यास्मिन शेख येत्या २१ जून रोजी ९६ वर्षांच्या होत आहेत. त्यानिमित्ताने मी त्यांचे अभीष्टचिंतन करतो आणि मराठी भाषेचे अधिकाधिक भले होण्यासाठी त्यांना निरामय जीवन लाभो, अशी प्रार्थना करतो.
-प्रा. बाळकृष्ण कवठेकर