पेटते बंगाल (भाग ५); “तुझ्या रक्ताने आम्ही होळी खेळणार...”

    22-May-2021   
Total Views | 127
tmc_1  H x W: 0



पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीत तृणमूल काँग्रेसला बहुमत मिळाले आणि त्यानंतर राज्यात हिंसेचे थैमान सुरू झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, अभाविप कार्यकर्त्यांच्या हत्या करणे, त्यांच्या कुटुंबियांवर हल्ले करणे, भाजपसमर्थक अनुसूचित जाती आणि जमातींच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करणे, महिलांवर बलात्कार करणे असे प्रकार सुरू झाले. राज्यात अशी स्थिती असतानाही ममता बॅनर्जी आपल्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आणि राष्ट्रीय नेतृत्वाचे स्वप्न पाहण्यास मश्गूल आहेत. मात्र, बंगालमधील ‘ममतामयी’ हिंसाचाराची भीषण परिस्थिती दैनिक मुंबई तरुण भारत समोर आणत आहे. आजच्या पाचव्या भागात भाजप कार्यकर्ते सौरव शॉ यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती घेणार आहोत.
 
 
 
 
नवी दिल्ली, पार्थ कपोले : “विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहिर झाल्यानंतर ४ तारखेस तृणमूल काँग्रेसच्या जवळपास ४५० गुंडांनी माझ्या घरावर हल्ला केला. त्यामध्ये मुस्लिमांची संख्या सर्वाधिक होती. तू आणि तुझ्या वडिलांच्या रक्ताने आम्ही होळी खेळणार, लक्षात ठेव. अशी धमकी मला देऊन गेले. त्यामुळे बंगालमध्ये घटनेचे राज्य अस्तित्वात नाही असे माझे स्पष्ट मत आहे”. हिंसापिडीत भाजप कार्यकर्ते सौरव शॉ दैनिक मुंबई तरुण भारतशी बोलताना आपल्यावरील हल्ल्याविषयी सांगत होते.
 
 
 
पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसाराचारामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या दहशतीमुळे भाजपचे असंख्य कार्यकर्ते, समर्थक आपला जीव मुठीत धरूनच जीवन जगत आहेत. तृणमूल काँग्रेसच्या हिंसेचा फटका बसलेले भाजपचे कांथी गावातील कार्यकर्ते सौरव शॉ यांच्याशी मुंबई तरुण भारतने संपर्क केला असता त्यांनी भीषण वास्तव सांगितले. ते म्हणाले, “आमचे कुटुंब भाजपसमर्थक आहे, माझे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत, त्यांमुळे मीदेखील लहानपणापासूनच शाखेत जायचो. त्यानंतर मग मी भाजपचे काम सुरू केले, कांथी उत्तर या मतदारसंघामध्ये भाजपच्या एका बुथची जबाबदारी माझ्यावर आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहिर झाल्यानंतर दोन दिवसांनी १५० पेक्षा जास्त मोटारसायकलवरून आलेल्या तृणमूल कार्यकर्त्यांनी गावात गोंधळ घातला. एका मोटारसायकल वर तीन लोक होते, अशा जवळपास ४५० तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी माझ्या घरावर हल्ला केला. माझी आई, पत्नी आणि दीड वर्षाचा मुलगा यांना अगोदरच सुरक्षित ठिकाणी नेल्याने ते वाचले. मात्र, मला आणि माझ्या वडिलांना मारहाण करण्यात आली आणि तुमच्या दोघांच्या रक्ताने आम्ही होळी खेळणार, लक्षात ठेव. अशी धमकी ते गुंड आम्हाला देऊन गेले”.
 
 
 
तृणमूल काँग्रेसच्या त्या हल्लेखोरांनी सौरव शॉ यांचे घर उध्वस्त केले. व्यवसायाने रस्ते बांधणी कंत्राटदार असलेल्या सौरव रॉय यांचे या हल्ल्यामध्ये जवळपास २ लाखांचे नुकसान झाले आहे. कारण घरावर हल्ला करतानाचा लूटमारही करण्यात आली. शॉ यांच्या घरामध्ये असलेल्या चंडीमाता आणि भगवान विश्वकर्मा यांचे पितळी सिंहासनही हल्लेखोरांनी लुटून नेले. या हल्लेखोरांमध्ये मुस्लिम कार्यकर्त्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे शॉ यांनी सांगितले. घराचे ग्रील तोडण्यात हल्लेखोर अपयशी ठरल्यानेच माझा आणि वडिलांचा जीव वाचल्याचेही शॉ यांनी यावेळी नमूद केले.
 
 
 
आमचे मतदान ओळखपत्र, आधार, पॅन कार्ड सरकारने परत घ्यावे...
 
 
 
पश्चिम बंगालमध्ये वेचून संघ, भाजप आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत. राज्यातील पोलिस प्रशासन आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मात्र लांगुलचालन करण्यात व्यस्त आहेत. आता माझ्यावर खोटे गुन्हे दाखळ करून त्रास देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे बंगालमध्ये सर्वसामान्य नागरिक सुरक्षित नाही, भारतीय राज्यघटनेचे पालन करणे तर दूरचीच गोष्ट. त्यामुळे राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांचे मतदान ओळखपत्र, आधार, पॅन कार्ड हे परत घ्यावे. कारण नागरिक म्हणून आम्हाला बंगालमध्ये दुय्यम वागणूक दिली जात असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया सौरव शॉ यांनी व्यक्त केली.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121