मुंबई : मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक राज्यात तोक्ते वादळाने थैमान घातले. सोमवारी आलेल्या या वादळामध्ये मुंबईच्या उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी पाणी भरले होते. गेले दोन दिवस झालेल्या या पावसामध्ये वरळीतल्या अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. यावरून भाजपचे नेते निलेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी 'वरळीकर विचारत आहेत तो ‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे?' असे म्हणत टीका केली.
निलेश राणे यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी वरळीतील एका भागातील व्हिडीओ शेअर केला आहे. ‘हे चित्र वरळी मतदारसंघाचं आहे. वरळीकर विचारतायत तो ‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे? ती मुंबई पॅटर्नची पतंग कुठे गेली? एका पावसात वरळी पॅटर्न लोकांना दिसेल, सगळीकडे थुकपट्टी करून चालत नाही.’, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी एक व्हिडीयो शेअर केला, ज्यामध्ये गुडघाभर साचलेल्या पाण्यातून लोकं मार्ग काढताना दिसत आहेत.