व्यवसायातील ‘विक्रम’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2021
Total Views |

विक्रम कदम _1  



नोकरी करता करता स्वत:चा व्यवसाय करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. पण, ते केवळ दुसरा करतो म्हणून न करता, त्यातील संपूर्ण माहिती व अनुभव घेऊन केल्यास नक्कीच यशस्वी होऊ शकतो. ‘वरदायिनी ऑटो’चे प्रमुख विक्रम कदम यांचा प्रवासही असाच आहे. तेव्हा, जाणून घेऊया दहा वर्षे नोकरी केलेल्या आणि आता व्यवसायाला दहा वर्षे पूर्ण झालेल्या विक्रम कदम यांच्याबद्दल....
 
  
व्यवसायात उतरण्याआधी संबंधित क्षेत्रात कमीत कमी सहा महिन्यांचा तरी प्रत्यक्ष नोकरीचा अनुभव घेतलाच पाहिजे, असा मोलाचा सल्ला ‘वरदायिनी ऑटो’चे प्रमुख विक्रम कदम देतात. असे का...? तर ते समजून घेण्याआधी जाणून घेऊया विक्रम कदम यांचा नोकरी ते यशस्वी व्यावसायिकापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास...
 
 
विक्रम कदम यांचा जन्म मराठी नोकरदार मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. आई आणि वडील दोघेही नोकरीला असल्याने घरातही साहजिकच मुलांनीही नोकरीच करावी, हे सांगणारे वातावरण होते. शिक्षणानंतर विक्रम कदम यांनी तसे केलेही. मुंबईतील ’मनबा फायनान्स’ कंपनीमध्ये त्यांनी सुमारे दहा वर्षे नोकरी केली. इथे ते ‘मार्केटिंग’ विभागात कार्यरत होते आणि ग्राहकांना दुचाकी खरेदी करण्यासाठी लागणारे कर्ज, त्यातून दुचाकी गाड्यांचे शोरुम, ’ऑथोराईज डिलर’, ‘सब डिलर’ यांच्याशी संपर्क येत गेला. दहा वर्षे एकाच क्षेत्रात काम केल्याने त्यांच्या ओळखीही भरपूर झाल्या. पण, कालांतराने नोकरी ही नोकरीच असते, असा विचार विक्रम कदम यांच्या मनात येऊ लागला. त्यातूनच आपण आपला स्वत:चा व्यवसाय करायला हवा, असा मनोदय त्यांनी केला. दुसरे कोणतेही क्षेत्र निवडण्यापेक्षा आपण ज्या क्षेत्रात गेल्या दशकभरापासून काम करत आहोत, तेच निवडून व्यवसाय केलेला बरा, हेही त्यांनी निश्चित केले व त्यातून ‘वरदायिनी ऑटो’ या ‘मल्टिब्रॅण्ड’ दुचाकी शोरुमची कल्पना आकाराला आली.
 
 
 
तथापि, मराठी मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तीने चांगली नोकरी सोडून व्यवसायात वळायला कुटुंबाचा विरोध हा असतोच, तसा तो विक्रम कदम यांनाही झाला. कारण, विक्रम कदम यांना ‘मनबा फायनान्स’मधील दहा वर्षांच्या नोकरीनंतरचे वेतन मासिक ७० हजार इतके मिळत होते. त्यामुळे इतक्या मोठ्या वेतनाची नोकरी सोडून व्यवसाय कशाला, असे प्रश्न कुटुंबातून आई-वडील, पत्नी यांनी उपस्थित केले. पण, विक्रम कदम यांनी त्यांना समर्पक उत्तरे दिली. तसेच व्यवसाय सुरू करण्याचे तर ठरवले, पण त्यात यश येईल, अपयश येईल, हा नंतरचा भाग; तोपर्यंत आर्थिक प्राप्ती सुरू राहायला हवी, या विचाराने पत्नीला ’ब्युटी पार्लर’ सुरू करायला त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यांच्या पत्नीला ‘फॅशन डिझायनिंग’ची आवड होती, त्या जोडीला २००८ साली त्यांनी ‘ब्युटी पार्लर’ सुरू केल्याने आर्थिक प्राप्तीही सुरु झाली.
 
 
 
 
अशा प्रकारे पत्नीचा व्यवसाय तीन वर्षे स्थिरस्थावर झाल्यानंतर विक्रम कदम यांनी २०११ साली ‘वरदायिनी दुचाकी शोरुम’ची स्थापना केली. नंतर मात्र कुटुंबातील प्रत्येक सदस्याने त्यांना पाठिंबा दिलाच, पण तसा पाठिंबा ऑटोमोबाईल क्षेत्रातून मिळणेही गरजेचे होते. कारण, विक्रम कदम यांनी दुचाकी शोरुम सुरु करण्याचे तर ठरवले, पण त्यासाठी मोठ्या भांडवलाची आवश्यकता असते, जे मध्यमवर्गीय व्यक्तीकडे असू शकत नाही. मात्र, विक्रम कदम यांनी ‘मनबा फायनान्स’मध्ये केलेली दहा वर्षांची नोकरी, त्यातील अनुभव, विविध लोकांच्या झालेल्या ओळखी, संपर्कामुळे त्यांना ऑटोमोबाईल क्षेत्रातील व्यक्तींचा, व्यावसायिकांचा पाठिंबा मिळाला. विक्रम कदम यांचे शोरुम ‘सब डिलर’ श्रेणीतले होते, यात ‘ऑथोराईज डिलर’कडून दुचाकींच्या पूर्ण किमतीइतके पैसे भरून त्या आपल्या शोरुमला आणाव्या लागतात. पण, तितके पैसे नसल्याने विक्रम कदम यांना अनेकांनी त्यांच्या ‘क्रेडिट’वर दुचाकी शोरुममध्ये ठेवायला दिल्या. काही वेळा त्यांनी स्वत:ही पैसे भरले आणि विक्रम कदम यांचा व्यवसाय सुरू झाला.
 
 
 
गेली दहा वर्षे विक्रम कदम यांचा व्यवसाय चांगल्याप्रकारे सुरू आहे. आजपर्यंत त्यांनी आपल्या ‘वरदायिनी ऑटो शोरुम’मधून १२ हजारांपेक्षा जास्त दुचाकींची विक्री केली आहे. विशेष म्हणजे, विक्रोळीला राहणार्‍या विक्रम कदम यांचे दुचाकी शोरुम आहे. मुलुंड पूर्वेला आणि इथे त्यांना सर्वांची उत्तम साथ मिळाली. सोबतच त्यांनी दीड वर्षांपूर्वी डोंबिवलीला आणखी एक दुचाकी शोरुमही सुरू केले. आपल्या या यशाचे गमक सांगताना विक्रम कदम म्हणतात की, “आम्ही आमच्या शोरुममध्ये सर्वच कंपन्यांच्या दुचाकी ठेवतो. त्याचबरोबर मेकॅनिकल सपोर्ट’, ‘इन्शुरन्स’, ‘स्क्रॅप’, ‘एक्सचेंज लोन’ अशा सुविधाही देतो. तसेच प्रत्येक महिन्याला ‘कॅशबॅक’, शून्य व्याजदर अशा आकर्षक ऑफरही देतो.” यामुळे व्यवसाय उत्तम सुरू असल्याचे ते सांगतात.
 
 
 
 
दरम्यान, गेल्या वर्षीपासून सर्वत्र कोरोनाचा फैलाव झाला. त्यामुळे अनेक व्यवसाय थांबले. पण, सार्वजनिक वाहतूक रेल्वे, बस वगैरे बंद असल्याने दुचाकींचा खप वाढला. त्यातूनच कर्मचारी वाढवण्याची वेळ आली, असेही विक्रम कदम सांगतात. भविष्यातील ध्येय काय, असे विचारल्यावर कोणत्याही एका ‘ब्रॅण्ड’चा ‘ऑथोराईज डिलर’ होण्याचे उद्दिष्ट असल्याचे ते सांगतात. तसेच व्यवसायाबरोबर सामाजिक क्षेत्रातदेखील त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. ‘रोटरी क्लब ऑफ मुलुंड पूर्व’ या क्लबचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले आहे, तसेच अनेक सामाजिक संघटनेचे ते पदाधिकारीदेखील आहेत. विक्रम कदम यांना पुढील प्रवासासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा.
 
 
यशाचा मूलमंत्र
आपल्याला ज्या क्षेत्रात व्यवसाय करायचा असेल, त्यात आधी किमान सहा महिने तरी नोकरी करायला हवी, जेणेकरुन तिथे काम करताना आपल्याला त्या क्षेत्रातील खाचखळगे समजतात, संपूर्ण माहिती घेता येते. पण, तसे न केल्यास फक्त दुसर्‍याचे पाहून व्यवसायात फायदाच फायदा असल्याचा विचार करून तसा व्यवसाय सुरू केल्यास अपयशाची भीती असते. त्यामुळे आधी पूर्ण माहिती घ्या, मगच उतरा.
 
 
                                                                                                                           - महेश पुराणिक
@@AUTHORINFO_V1@@