अहमदाबाद : भारत आणि इंग्लंडमधील चौथ्या कसोटीचा गुरुवारी पहिला दिवस पार पडला. हा दिवस फिरकीपटूंनी गाजवलाच, शिवाय विराट कोहली आणि बेन स्टोक्सच्या शाब्दिक चकमकीनेदेखील हा दिवस गाजला. भारताचा तेजगती गोलंदाज मोहम्मद सिराजने जो रूटची महत्त्वाची विकेट घेतल्यानंतर बेन स्टोक्सने सिराजला डीवचल्याचे चित्र कॅमेरात कैद झाले. यानंतर विराट आणि स्टोक्समध्ये काही शाब्दिक चकमक झाल्याचेदेखील कॅमेरात टिपले. त्यामुळे हा चांगलाच चर्चेचा मुद्दा ठरला.
दिवसाचा खेळ संपल्यानंतर मोहम्मद सिराजने मैदानावर झालेल्या शब्दिक चकमकीबाबतचा खुलासा केला. याबाबत सिराजला विचारण्यात आल्यावर तो म्हणाला, "बेन स्टोक्सने माझ्याकडे पाहून शिवी दिली. ही गोष्ट मी विराटला सांगितली." त्यानंतर विराटने जाऊन स्टोक्सला यासंदर्भात विचारणा केली असता दोघांमध्ये बराच वेळ शाब्दिक वाद सुरू होता. हा वाद वाढू नये म्हणून पंचानी मध्यस्ती केली. दरम्यान, भारतीय फिरकीसमोर पुन्हा एकदा इंग्लंडचा संघ गार पडला.