'इलू इलू' च्या भव्य प्रीमियरला आमिर खानची हजेरी: मराठी चित्रपटसृष्टीचे केले भरभरून कौतुक!

    30-Jan-2025
Total Views |

image
 
मुंबई : '१९९८' या मराठी चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर सोहळा २९ जानेवारी २०२५ रोजी वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात अभिनेते आमिर खान उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीचे कौतुक केले आणि सर्व प्रेक्षकांशी मराठीत संवाद साधताना ते म्हणाले “मलाही इलू इलू चित्रपटाचा एक भाग व्हायचं होत पणकाही कारणास्तव नाही होता आलं. पण जर कधी संधी मिळाली तर मराठी चित्रपटसृष्टीचा भाग व्हायला नक्की आवडेल या सिनेमाची सुंदर कहाणी आणि कलाकारांचा परफॉर्मन्स सुद्धा चांगलाय. अजिंक्यचा पहिलाच सिनेमा आहे हा सुखद धक्का आहे.“
 
या कार्यक्रमात या चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री एली अवराम यांनी आपल्या आनंदाची भावना व्यक्त करताना सांगितले, "माझे सर्व मित्र येथे आले आहेत, परंतु मी सर्वात जास्त आनंदी आहे कारण आज माझी आई येथे आली आहे." तसेच, त्यांनी आमिर खान यांचेही आभार मानले की त्यांनी वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहून चित्रपट पाहिला. "आजचा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय असेल," असेही त्या म्हणाल्या.
 
अभिनेता श्रीकांत यादव यांनीही आपला आनंद व्यक्त करताना सांगितले, "चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याआधीच आता पूर्ण थिएटर भरले आहे. फार छान वाटतेय; बोर्डाच्या परीक्षेच्या पहिले प्रीलीयम पेपर असतो अगदी तसच झालयं."
 
'इलू इलू १९९८' हा मराठी चित्रपट ३१ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात एली अवराम, निशांत भावसार, मीरा जगन्नाथ, श्रीकांत यादव आणि वीणा जामकर यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अजिंक्य फाळके यांनी केले आहे. हा चित्रपट प्रेमाच्या अलवार भावनेची हळूवार झलक देणारा आहे, जो प्रेक्षकांना त्यांच्या पहिल्या प्रेमाच्या आठवणींमध्ये घेऊन जाईल. चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये 'क्षण प्रेमाचे..गोड गुलाबी आठवणींचे' असे वर्णन करण्यात आले आहे. चित्रपटाच्या निर्मितीमध्ये बाळासाहेब फाळके आणि हिंदवी फाळके यांचा सहभाग आहे, तर सहनिर्माते यश मनोहर सणस आहेत. छायांकन योगेश कोळी यांनी केले आहे, तर संकलन नितेश राठोड यांचे आहे.