मुंबई : सचिन वाझे प्रकराणानंतर महाविकास आघाडीत खलबत सुरू आहेत. तसेच यासंदर्भातील बैठकांचा जोरदेखील कालपासून वाढला आहे. आज सकाळी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत विरोधक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत असल्याने, त्या ठिकाणी मुंबई पोलीस आयुक्ताचा बळी देऊन हे प्रकरण निस्तारण्याचा महाविकासआघाडी कडून प्रयत्न सुरू असल्याची म्हटले जात आहे.
आजच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, अनिल परब, बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील आदी नेते उपस्थित होते. आज सकाळी वर्षा बंगल्यावर महाविकास आघाडीची बैठक पार पडली. यावेळी राज्यातील विविध मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली. तसेच मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदली संदर्भात काही चर्चा सध्या नाही असं त्यांनी सांगितले. सचिन वाझे प्रकरण हे गृह खात्याचे असून गृहमंत्री आणि मुख्यमंत्री त्यांच्या स्तरावर निर्णय घेतील. तो त्यांचा अधिकार आहे. मात्र, या आधी ज्याप्रमाणे बातम्या समोर आल्या त्यात काहीच तथ्य नसल्याचे देखील जयंत पाटील म्हणाले.