मराठी भाषा आणि विद्यापीठाच्या मुद्दयावर आक्रमक होत व्यक्त केला संताप
मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि आमदार दिवाकर रावते यांनी मुद्द्यावरून शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले. मराठी भाषा आणि मराठी विद्यापीठाच्या मुद्दयावर आक्रमक होत त्यांनी 'शिवसेनेचा मुख्यमंत्री असलेल्या महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना देखील अर्थसंकल्पात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एक शब्द देखील व्यक्त करण्यात आलेला नाही, असे सांगत रावते यांनी जाहीरपणे खंत व्यक्त केली.
मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर स्वतःला आग्रही म्हणवणारे शिवसेना पक्षाचे उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असतानाही या मुद्द्याकडे दुर्लक्ष होत आहे, असे म्हणत रावते यांनी आपली नाराजी व्यक्त केली. त्याचप्रमाणे या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सभागृहात होणाऱ्या इंग्रजी शब्दांच्या वापराबबातही भाष्य केले. सभागृहाच्या कामकाजात इंग्रजी शब्दांचा वापर करणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. मराठीमध्ये शब्द संग्रह असताना देखील इंग्रजी शब्द वापरणे हास्यास्पद प्रकार असल्याचे ते म्हणाले.
तसेच "मुंबईतील बॉम्बे क्लबचे नाव अजूनही तेच आहे. मुंबईत इतर सर्व भाषा आणि परप्रांतीयांसाठीचे भवन उभारले गेले आहे; असे असताना मराठीचे भवन का नाही, असा सवाल उपस्थित करत शिवसेनाला मराठीबाबत एक शब्द उच्चारता आला नाही आणि हे दुर्दैवी असल्याचे देखील रावते म्हणाले. महत्वाचे म्हणजे, 'मुख्यमंत्री शिवसेनेचा आणि अर्थसंकल्पात मात्र मराठीसाठी काहीच नाही, असे नमूद करताना मी मेल्यावर साहेबांना भेटलो आणि वर गेल्यावर मला त्यांनी विचारलं की मराठी भाषेसाठी काय केलं, तर मग मी त्यांना काय उत्तर देणार?, असा सवालही शिवसेनेच्या दिवाकर रावते यांनी विचारला.